युद्धग्रस्त युक्रेनमधील सर्वात कमी वयाचे खासदार असणाऱ्या स्वितोस्‍लाव यूराश यांनी भारताचं कौतुक केलंय. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी भारताने मानवी दृष्टीकोनातून घेतलेल्या निर्णयांबद्दल या खासदाराने समाधान व्यक्त केलंय. त्यांनी युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्कींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये यूराश यांनी, “भारत त्या देशांपैकी एक आहे, जो या शतकभराच्या कालावधीचं भविष्य निश्चित करु शकतो. रशियासोबत असलेल्या भारताच्या संबंधांबद्दल बोलायचं झाल्यास, आमच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरुन चर्चा केल्याबद्दल आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. भारताकडून मानवी दृष्टीकोनातून घेण्यात येणाऱ्या निर्णयांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असं म्हटलंय. “रशियाला जे करायचं ते त्यांच्याकडून केलं जात आहे. मात्र एखाद्या देशावर हल्ला करण्यासाठी आणि त्या देशाच्या सीमेचं उल्लंघन करण्यासाठी रशियाला शिक्षा दिली पाहिजे. अगदी भारतानेही यासाठी त्यांना शिक्षा दिली पाहिजे,” असं म्हणत २६ वर्षीय यूराश यांनी रशियासोबतच्या संबंधांबद्दल भारताने विचार करावा असं म्हटलंय.

भारत आणि रशियाचे चांगले राजकीय संबंध असल्याचा संदर्भ देत यूराश यांनी युक्रेनविरोधात रशियाने सुरु केलेल्या युद्धासंदर्भातील भारताच्या भूमिकेबद्दल त्यांनी पुनर्विचार करायला हवा, असं म्हटलंय. भारत आणि रशियाबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही देशांमधील राजकीय मैत्री आणि सहकार्य राखण्याची संधी आहे. मात्र माझ्या मते केवळ युक्रेनच नाही तर पुतिन यांच्या कार्यकाळात मागील २० वर्षांमध्ये रशियाने केलेल्या चुकीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या भूमिकेबद्दल पुन्हा विचार करणं गरजेचं आहे, असं यूराश यांनी म्हटलंय.

युक्रेनमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल असं तुम्हाला वाटतं का असा प्रश्न विचारण्यात आला असता यूराश यांनी, “हे क्रेमलिनवर (रशियातील राजकीय घडामोडींचं केंद्र असणारी इमारत) अवलंबून आहे. त्यांच्याकडून हल्ले होत राहिले तर आम्ही लढत राहणार,” असं यूराश म्हणाले आहेत.

यूराश यांनी काही दिसवांपूर्वी हातात बंदूक घेतलेला फोटो पोस्ट केला होता. त्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “त्यांनी (रशियाने) खर्किव्हला वेढा घातला आहे. युक्रेनला एकत्र येऊन रशियाच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याची गरज आहे. आता इथे प्रत्येकजण सैनिक आहे,” असं यूराश यांनी म्हटलंय. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलंय.