Indian Diplomats in Bangladesh : बांगलादेशात संसदेच्या निवडणुका होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंची हत्या होत आहे. सातत्याने हिंदू कुटुंबांना टार्गेट केलं जातंय. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावरून मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता बांगलादेशातील संसदेच्या निवडणुकीआधीच मोदी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

बांगलादेशातील सुरक्षेच्या कारणास्तव भारताने मंगळवारी बांगलादेशात तैनात असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला, असे वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे. “सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून, आम्ही उच्चायुक्तालय आणि पदांवर असलेल्या आमच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना भारतात परतण्याचा सल्ला दिला आहे”, असे अधिकृत सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. पीटीआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, मिशन आणि बांगलादेशातील सर्व पोस्ट खुल्या आणि कार्यरत राहतील. भारताचे ढाका येथे उच्चायुक्तालय आहे आणि चट्टोग्राम, खुलना, राजशाही आणि सिलहट येथे इतर राजनैतिक कार्यालये आहेत.

कुटुंबासाठी असुरक्षित देश

बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल भारताने वारंवार चिंता व्यक्त केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर, भारत आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले. कुटुंबासाठी असुरक्षित असा देश म्हणून पाकिस्तानची नोंद होती, आता बांगलादेशाचाही त्या यादीत समावेश झाला आहे.