पीटीआय, नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ८५८ कोटींचे दोन संरक्षण करार केले. यात भारतीय लष्करासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी रशियाच्या ‘रोसोबोरॉनएक्सपोर्ट’ या कंपनीबरोबर ४४५ कोटी रुपयांचा तसेच भारतीय नौदलाच्या ‘पी८आय’ या लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानांच्या देखभालीसाठी ‘बोईंग इंडिया डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड’शी ४१३ कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे.
भारतीय लष्करासाठी ‘तुंगुस्का’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालींच्या खरेदीचा ४४५ कोटी रुपयांचा हा करार रशियाच्या ‘जेएससी रोसोबोरॉनएक्सपोर्ट’बरोबर करण्यात आला, असे मंत्रालयाने नमूद केले. ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे विमाने, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसह विविध हवाई धोक्यांविरुद्ध देशाच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमतांमध्ये वाढ करतील. हा करार भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक संरक्षण भागीदारीला आणखी बळकट करेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
‘बाय इंडियन’ श्रेणीनुसार, ‘पी८आय’ विमानांच्या तपासणीसाठी हा करार १०० टक्के स्वदेशी घटकांचा वापर करून करण्यात आला आहे. बोईंग ‘पी८आय’ एक बहुउद्देशीय, लांब पल्ल्याचे सागरी टेहळणी आणि पाणबुडीविरोधी लढाऊ विमान असून, हिंद महासागरातील भारतीय नौदलाच्या सागरी पाळत मोहिमांमध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सद्य:स्थितीत भारतीय नौदल १२ ‘पी-८आय’ विमानांचा वापर करत आहे.
