India deployed nuclear warheads: भारताने इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रत्यक्ष वापरासाठी अण्वस्त्रे तैनात केली आहेत. भारताने १२ अण्वस्त्रे तैनात केली आहेत. शस्त्रास्त्रे आणि शस्त्र नियंत्रण या विषयांवर काम करणारी स्वीडनच्या नामांकित संस्था ‘सिपरी’ थिंक टँकने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. चीनने देखील आपल्या तैनात अणुबॉम्बची संख्या २०२५ मधील २४ वरून २०२६ मध्ये ३४ केली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सिपरीच्या अहवालातून समोर आली माहिती
’स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने सोमवारी आपले सिपरी इयरबुक २०२६ प्रसिद्ध केले आहे. यामध्ये जगातील विविध देशांच्या अण्वस्त्र क्षमतांची माहिती देण्यात आली आहे. भारताचा अण्वस्त्रांचा केवळ साठा केला नसून, त्यातील काही प्रत्यक्ष मोहिमेसाठी तैनात केली आहेत आणि असे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जगातील देश आता राष्ट्रीय शक्तीचे साधन म्हणून अणुबॉबवर पूर्वीपेक्षा अधिक अवलंबून राहू लागले आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. अण्वस्त्राचे दोन प्रकार असतात एक म्हणजे साठ्यातील अण्वस्त्रे आणि दुसरी म्हणजे तैनात अण्वस्त्रे.
साठ्यातील अण्वस्त्रे आणि तैनात अण्वस्त्रे म्हणजे काय?
गोदामात सुरक्षित ठेवलेली किंवा राखीव अण्वस्त्रांना साठ्यातील अण्वस्त्रं म्हटलं जातं. लष्कराच्या देखरेखीखाली असणारी ही अण्वस्त्र कोणत्याही क्षेपणास्त्रावर किंवा प्रक्षेपकावर बसवलेली नसतात. तात्काळ वापरासाठी नसली तरी गरज पडल्यास ती शस्त्रप्रणालीवर तैनात केली जाऊ शकतात. दुसरे म्हणजे आधीच युद्धनौका, विमाने किंवा क्षेपणास्त्रांवर बसवलेली तैनात अण्वस्त्रे. अगदी कमी वेळेत वापरण्यासाठी सज्ज ठेवली जातात. भारत आपली ही १२ तैनात अण्वस्त्रे ‘न्यूक्लियर ट्रायड’ तैनात केली आहेत.
चीनच्या तैनात अण्वस्त्रांची संख्या वाढली
सिपरीच्या अहवालानुसार, पाकिस्तानने अद्याप एकही अण्वस्त्र तैनात केलेले नाही. पण, चीनने २०२४ मध्ये २४ अण्वस्त्रे तैनात केली होती, त्याची संख्या वाढवून आता ३४ एवढी करण्यात आली आहे. याच अहवालानुसार, जानेवारी २०२६ पर्यंत जगात एकूण अंदाजे १२,१८७ अणुबॉम्ब अस्तित्वात होते. यापैकी जवळपास ९,७४५ अणुबॉम्ब संभाव्य वापरासाठी लष्करी साठ्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. तैनात अणुबॉम्बच्या संख्येत रशिया जगातील सर्वात आघाडीचा देश असून त्यांच्याकडे १,७९६ अणुबॉम्ब तैनात आहेत.
