अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांचे वक्तव्य

सेऊलमध्ये झालेल्या परिषदेत भारताला आण्विक पुरवठादार गटात (एनएसजी) स्थान न मिळाल्याबद्दल अमेरिका नाराज झाल्याचे अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे. मात्र भारताला या गटांत स्थान मिळावे यासाठी अमेरिका ४८ सदस्य देशांसमवेत काम करीतच राहील, भारत सदस्यत्व मिळण्यास पात्र आहे, असेही वर्मा यांनी स्पष्ट केले.

भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणुसहकार्याचा संदर्भ देताना वर्मा म्हणाले की, जवळपास ६० दशलक्ष लोकांसाठी वीज निर्माण करणाऱ्या १५ वर्षांच्या प्रकल्पासाठी दोन्ही देश काम करतील, हा करार गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित आहे, असे ते म्हणाले.

जागतिक पातळीवरील संस्थांमध्ये भारताच्या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा आहे त्यामुळे भारताला संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेत स्थान मिळण्याबाबत वर्मा यांनी एका कार्यशाळेत भाष्य केले. अपेकमध्ये भारताला असलेल्या स्वारस्याचे आम्ही स्वागतच करू, असेही ते म्हणाले.

जवळपास सहा वर्षांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला एनएसजीमध्ये प्रवेश देण्यास पाठिंबा दर्शविला होता. तेव्हापासून आम्ही सातत्याने भारतासमवेत आणि एनएसजी सदस्य देशांसमवेत काम करीत आहोत आणि भारताला सदस्यत्व मिळण्यासाठी पाश्र्वभूमी तयार करीत आहोत. एनएसजीमध्ये समावेश होण्यास भारत पात्र आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे भारताला एनएसजी प्रवेश नाही- अझिझ

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी १७ देशांच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रासह पाकिस्तानने व्यापक राजनैतिक प्रयत्न केल्यानेच भारताला आण्विक पुरवठादार गटांचे (एनएसजी) सदस्यत्व मिळाले नाही, असा दावा पाकिस्तानातील एका उच्चपदस्थ राजनैतिक अधिकाऱ्याने केला आहे.

एनएसजीबाबत पाकिस्तानची भूमिका जागतिक पातळीवर नेत्यांना समजण्यासाठी व्यापक राजनैतिक प्रयत्न करण्यात आले, असे नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ यांनी सांगितले. शरीफ यांनी १७ देशांच्या पंतप्रधानांना वैयक्तिक पत्र लिहिले, असेही अझिझ यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.