“भारताने चीनच्या सैनिकांना बंदी बनवलं होतं, नंतर सोडून देण्यात आलं”, केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

चीनचे ४० हून अधिक जवान ठार झाल्याचा केंद्रीय मंत्र्याचा दावा

संग्रहित

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवलं होतं असा दावा केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माजी लष्कर प्रमुख असणारे व्ही के सिंग यांनी हा दावा केला आहे. १५ जून रोजी झालेल्या चकमकीत दोन्ही देशाच्या जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती असं व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे. चीनने आपले काही जवान परत केल्याचं वृत्त आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

“त्याचप्रमाणे नियंत्रण रेषा पार करुन आपल्याकडे आलेल्या चिनी सैनिकांनाही आपण परत केलं आहे,” असं व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे. “जर आपले २० जवान शहीद झाले असतील तर ठार झालेल्या चिनी सैनिकांची संख्याही जास्त असेल. जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत,” असं व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे. व्ही के सिंग यांनी दावा केला असला तरी भारतीय लष्कराकडून अद्याप यासंबंध काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.

गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू ही भारत-चीन सीमेवर गेल्या ४५ वर्षांत झालेली पहिलीच घटना आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी १९९३ मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे. गलवान खोऱ्यातील घटनेमुळे या कराराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये उभय बाजूच्या सैनिकांच्या माघारीच्या प्रक्रियेलाही मोठी खीळ बसली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India detained some chinese soldiers after face off later set free says vk singh in ladakh sgy