संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्रात पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला तिखट शब्दांत गोष्टी सुनावल्या आणि पाकिस्तानची लक्तरं शब्दांनी जगासमोर टांगली. पाकिस्तान ला ला लँड अर्थात अस्तित्वात नसलेल्या जगात आहे असं म्हणत पाकिस्तानला आरसा दाखवण्याचं काम केलं.

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत नेमकं काय घडलं?

भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवर थेट प्रहार केला. “पाकिस्तानला कदाचित या गोष्टीचा सामना करणं कठीण जाईल पण मी त्यांना हे सांगू इच्छिते की एकट्या जम्मू काश्मीरच्या विकासाचं बजेट हे त्यांच्या पूर्ण देशाच्या बेलाऊट पॅकेजच्या दुपटीहून अधिक आहे. पाकिस्तान मदत मिळावी म्हणून कटोरा घेऊन IMF च्या समोर उभा आहे. तसंच पाकिस्तान एक प्रकारच्या ला-ला लँड म्हणजेच अस्तित्त्वात नसलेल्या जगात जगतो आहे.वास्तवात जगात काय चाललं आहे हे त्यांना ठाऊकही नसावं.” अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानच्या अब्रूची लक्तरं त्यांनी जगाच्या वेशीवर टांगली आहेत.

अनुपमा सिंह यांची OIC वरही टीका

भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी इस्लामिक संघटना OIC वरही टीका केली. पाकिस्तान हा देश OIC ने राबवलेल्या प्रपोगंडाचा गुलाम झाला आहे. ही संघटना म्हणजे पाकिस्तानातील राजकीय तडजोडीसारख्या चुका करणारी एक संघटना ठरली आहे. पाकिस्तान हा देश आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या मनाला येईल तशा गोष्टी बोलत असतात, त्यांना कुठलाही आधार नसतो. पाकिस्तानने कितीही अपप्रचार केला तरीही काही उपयोग होणार नाही. पाकिस्तानचं हे म्हणणं आहे की जम्मू काश्मीरचं १९४७ मध्ये भारतात विलिनीकरण अयोग्य होतं. पाकिस्तानने आमच्याच देशात पाकव्याप्त काश्मीरमध्ये बेकायदेशीर रित्या कब्जा केला आहे आणि आता आम्हाला नावं ठेवत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जे मतदान झालं त्यात लोकांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला आणि हिंसेला नाकारलं आहे. जम्मू काश्मीरच्या लोकांना विकास हवा आहे. त्यामुळे तिथले लोक लोकशाहीचा मार्ग स्वीकारत आहेत असंही अनुपमा सिंह यांनी म्हटलं आहे.

भारताच्या लेकीचं कौतुक

पाकिस्तान हा देश IOC या संघटनेच्या हातचं बाहुलं झाला आहे. राजकीय फायदा व्हावा म्हणून या संघटनेचा वापर सोयीस्करपणे केला जातो आहे. संघटनाही पाकिस्तान सरकारचा वापर करते आहे. अनुपमा सिंह यांनी हे विधान केल्यामुळे आणि पाकिस्तानला सुनावल्यामुळे पाकिस्तानची जगासमोर लाज निघाली आहे. अनुपमा सिंह यांनी असंही म्हटलंय की जगातला सर्वात मोठा रेल्वे ब्रिज चिनाब नदीवर आहे. जर पाकिस्तानला तो दिसत नसेल तर ते खरोखर आभासी जगात जगत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी भारताच्या लेकीने त्यांना असं उत्तर दिलं की त्यांची बोलतीच बंद झाली. शिवाय जगासमोर लाज गेली ती वेगळीच. अनुपमा सिंह यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर भारताच्या लेकीचं सगळेच जण कौतुक करत आहेत.