मुंबई : भारतामध्ये वाढत्या आजारपणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. बेन ॲण्ड कंपनी व नेटहेल्थ यांच्या अहवालानुसार भारताला दरवर्षी सुमारे ०.८ ते १ ट्रिलियन डॉलर इतका आर्थिक तोटा सहन करावा लागतो. हा तोटा मुख्यतः लोक आजारी पडल्यामुळे काम करू शकत नाहीत किंवा त्यांची काम करण्याची क्षमता कमी होते यामुळे होतो. भारताला विकसित देश बनायचे असेल तर आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांचे आरोग्य सुधारले तर देशाची आर्थिक प्रगतीही वेगाने होईल.

या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की, एखाद्या देशाची प्रगती केवळ उद्योग, तंत्रज्ञान किंवा गुंतवणुकीवर अवलंबून नसते तर त्या देशातील लोक किती निरोगी आहेत यावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. जर लोक निरोगी असतील, तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि देशाच्या विकासात जास्त योगदान देऊ शकतात.सध्या भारताला एक मोठी संधी आहे, कारण देशात काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. २०१९ ते २०५३ या काळात हा फायदा भारताला मिळणार आहे. पण जर ही लोकसंख्या आजारी असेल तर ही संधी वाया जाऊ शकते. त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते.

जगातील अनेक देशांच्या तुलनेत असे दिसून आले आहे की ज्या देशांमध्ये लोक जास्त काळ निरोगी राहतात त्या देशांची अर्थव्यवस्था वेगाने वाढते. प्रत्येक अतिरिक्त निरोगी वर्षामुळे देशाच्या उत्पन्नात सुमारे ७.५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. भारतामध्येही परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. १९५० मध्ये लोक साधारणपणे ५० वर्षे निरोगी राहायचे प्रमाण होते ते प्रमाण आता वाढून सुमारे ६१ वर्षांपर्यंत पोहोचले आहे. तरीही हे प्रमाण अजून वाढवण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हे वय ७० वर्षांपर्यंत नेले, तर भारताची अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढू शकते.अहवालात चीन, दक्षिण कोरिया आणि पोलंड या देशांचे उदाहरण दिले आहे. या देशांनी त्यांच्या नागरिकांचे आरोग्य सुधारले आणि त्याचा थेट फायदा त्यांच्या अर्थव्यवस्थेला झाला. गेल्या काही वर्षांत त्यांनी मोठी आर्थिक प्रगती साध्य केली आहे.

सध्या भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या सुमारे २ टक्के खर्च करते. पण हा खर्च वाढवून ६ ते ७ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे रुग्णालये, डॉक्टर, औषधोपचार आणि आरोग्य सेवा अधिक चांगल्या होतील.तसेच, लोक आजारी पडण्याआधीच त्यांना निरोगी ठेवण्यावर भर देणे आवश्यक आहे. नियमित तपासण्या, लवकर निदान आणि वेळेवर उपचार यामुळे गंभीर आजार टाळता येऊ शकतात. डिजिटल आरोग्य सेवांचा वापर वाढवल्यास दुर्गम भागातील लोकांनाही उपचार सहज मिळू शकतील.तज्ज्ञांचे मत आहे की आरोग्य हा खर्च नसून देशाच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. जर लोक निरोगी असतील तर देश अधिक मजबूत आणि समृद्ध होईल. भारताला विकसित देश बनायचे असेल तर आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांचे आरोग्य सुधारले तर देशाची प्रगतीही आपोआप वेगाने होईल.