पीटीआय, नवी दिल्ली

‘‘जगातील आर्थिक स्थिती या वर्षी फारशी चांगली राहणार नसली, तरी दक्षिण आशियात भारताची अर्थव्यवस्था वाढणार आहे,’’ असा निष्कर्ष एका सर्व्हेमध्ये काढण्यात आला आहे.

पुढील आठवड्यात दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘चीफ इकॉनॉमिस्ट्स आउटलूक’चा अहवाल प्रसिद्ध झाला. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने म्हटले आहे, की जागतिक अर्थव्यवस्था काहीशी सुधारली आहे. पण, अस्थिरता कायम आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संधी आणि धोके दोन्ही तयार होत आहेत.

या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती कमकुवत राहणार असल्याचा अंदाज ५३ टक्के मुख्य अर्थतज्ज्ञांनी सर्व्हेमध्ये व्यक्त केला आहे. अहवालात म्हटले आहे, की प्रादेशिक स्तरावर दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेतील वाढ सर्वाधिक राहणार आहे. दोन तृतीयांश अर्थतज्ज्ञांनी ही वाढ अतिशय चांगली असेल, असे म्हटले आहे. यामध्ये भारताचे स्थान ठळक असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारामधील कुरबुरींचा फारसा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही.

भारताच्या निर्यातीवर अमेरिकेने आयातशुल्क वाढविल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आढाव्यात अर्थव्यवस्था गेल्या वर्षाच्या तुलनेत ८.२ टक्क्यांनी वाढत असल्याचे म्हटले होते.