Indian Embassy Iran Advisory: होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दिलेली मुदत काही तासांमध्ये समाप्त होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला संपूर्ण विनाश करण्याची धमकी दिली आहे. इराणकडून अमेरिकेबरोबर संवादाचे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने, युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. “पुढील ४८ तास घरातच थांबा”, अशी सूचना तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना केली आहे.
पुढील ४८ तास जिथे असाल तिथेच थांबा – दूतावास
“अजूनही इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी पुढील ४८ तास जिथे असाल तिथेच थांबावे. सर्व विद्युत केंद्र, लष्करी आस्थापना आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांवर जाणे टाळावे. घराच्या आतच राहावे आणि महामार्गावरून प्रवास करण्यापूर्वी दूतावासाशी समन्वय साधावा,” असे इराणमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या नियमावलीत म्हटले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांकही जाहीर
“दूतावासाने भाड्याने घेतलेल्या हॉटेल्समध्ये राहणाऱ्यांनी हॉटेलमध्येच थांबावे आणि तेथील दूतावास पथकांशी नियमित संपर्क ठेवावा,” असेही दूतावासाने म्हटले आहे. अधिकृत माहितीवर लक्ष ठेवण्याची विनंती दूतावासाकडून करण्यात आली आहे. शिवाय, आपत्कालीन संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
इराणमध्ये सुमारे ८००० भारतीय
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये सुमारे ८००० भारतीय आहेत आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने १,८६२ भारतीय नागरिकांना इराणमधून अर्मेनिया आणि अझरबैजान येथे भारतात पुढील प्रवासासाठी मदत केली आहे, ज्यामध्ये ९३५ भारतीय विद्यार्थी आणि ४७२ भारतीय मच्छीमारांचा समावेश आहे.
इराणकडून अमेरिकेबरोबर संवाद पूर्णपणे बंद
होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीचे आता काही तास शिल्लक आहेत. ट्रम्प यांच्या मागण्यांना इराणने हवा तसा प्रसिसाद दिलेला नाही. दरम्यान, आता अमेरिकेबरोबर सुरु असलेला सर्व प्रकारचा संवाद तेहरानने पूर्णपणे बंद केला आहे. ‘तेहरान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेसोबतचे सर्व राजनैतिक आणि अप्रत्यक्ष संवाद मार्ग बंद केले आहेत. दोन्ही देशातील संवाद बंद झाल्याने आता संघर्ष कोणते वळण घेणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
