सीमेवरील तणाव आणि दोन भारतीय सैनिकांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर भारत शाब्दिक युद्धखोरीत गुंतला असला तरी उपखंडाला युद्ध परवडणारे नसल्याने आम्ही त्या शाब्दिक युद्धात ओढले न जाता संयमाने पावले टाकू, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी बुधवारी सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला मंगळवारी ठणकावल्याच्या पाश्र्वभूमीवर खार प्रतिक्रिया देत होत्या.
भारत सरकार आणि तेथील काही नेते यांची चिथावणीखोर वक्तव्ये एएकून आम्ही कमालीचे निराश झालो आहोत. पण तरीही संयम न सोडण्याचा कित्ता आम्ही घालून देत आहोत, असेही खार यांनी संभावितपणे सांगितले. भारत, पाकिस्तान किंवा दक्षिण आशियाला दोन देशांतले युद्ध परवडणारे नसल्याने चर्चेचा मार्ग खुला राहिलाच पाहिजे, यावर आमचा भर आहे.