India E85 Fuel Draft Policy: भारतात आता अल्कोहोलवर धावणारी वाहने रस्त्यावर दिसू लागली तर आश्चर्य वाटायला नको. देशात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर धावणारी वाहने आता लवकरच भंगारात निघण्याची शक्यता असून, त्यांची जागा ८५ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर धावणारी वाहने घेण्याची शक्यता आहे. सरकारने यासाठी मसुदा तयार केला असून, लवकरच तो सूचित केला जाईल अशी माहिती समोर आली आहे. ई८५ वाहनांमध्ये ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोलचे मिश्रण इंधन म्हणून वापरले जाईल. २०१६ मध्येच सरकारने याबाबत नियोजन आखल्याचे सांगितले जात आहे.
लवकरच सरकारी घोषणा
मध्य आशियात सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे देशावर इंधन आणि गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार २०१६ मध्ये तयार केलेल्या या धोरणाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. द हिंदू या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सरकार लवकरच इथेनॉल-८५ संबधित मुसदा सूचित करण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये सध्या याबाबत विचार सुरु असल्याची माहिती मिळतेय. यासाठी आवश्यक चाचण्या देखील केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.
रस्त्यावर दिसतील ई-८५ वाहने
येत्या काही वर्षात रस्त्यावर ई-८५ वाहने रस्त्यावर धावताना दिसू लागतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ८५ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर धावणाऱ्या वाहनांशी निगडीत मसुदा तयार करण्यात आला असून, लवकरच तो सूचित केला जाण्याची शक्यता आहे. याच वृत्तात त्यांनी प्राथमिक चाचणी देखील झाल्याचा दावा केला आहे. याशिवाय विविध माध्यमांनी ई-८५ बाबत सरकार सकारात्मक असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
तांत्रिक बदलांची गरज
ई-८५ याची वेगळे इंधन म्हणून नोंद केली जाईल आणि सध्याच्या ई-२० पेक्षा वेगळं इंधन म्हणून त्याची विक्री केली जाईल. मोठ्या प्रमाणावर अल्कोहोलचे प्रमाण असल्याने वाहनांच्या इंजिनचे डिझाईन आणि त्याची इंधन क्षमता यातही बदल करावा लागणार असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा देखील विचार होणे अपेक्षित असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे. सध्या देशांत असणाऱ्या पंपांच्या वितरण पद्धतीतही बदल करावा लागणार आहे.
