पुणे : भारताने युरोपीय समुदायाशी मुक्त व्यापार कराराचे पाऊल उचलले आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतासह युरोपीय बाजारपेठेवर होईल. त्यातून भारतीय वाहन उद्योग आगामी काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवेल, असा विश्वास केंद्रीय अवजड व पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी व्यक्त केला.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) वतीने आयोजित सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (एसआयएटी) या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ही परिषद येत्या शुक्रवारपर्यंत (दि. ३०) मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे आयोजित करण्यात आली आहे.
कुमारस्वामी म्हणाले की, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वेगवान आर्थिक प्रगती सुरू आहे. उत्पादन वाढ, निर्यात, प्रगत संशोधन आणि विकास यासोबतच उदयोन्मुख सॉफ्टवेअर-आधारित गतिशीलता उपायांमध्ये वाहन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरत आहे. या परिषदेमुळे वाहन उद्योग क्षेत्रात नवीन ज्ञान आणि कल्पना निर्माण होतील. विकसित देश बनण्याच्या आणि शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या आपल्या संकल्पांकडे देश अधिक वेगाने मार्गक्रमण करताना पहायला मिळेल. भारतामध्ये सार्वजनिक वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची टक्केवारी ही ४० टक्के आहे. ती कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देत आहेत. आगामी काळात देशभरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्याचे नियोजन आहे.
या कार्यक्रमाला टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा, फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व एआरएआय गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रसन फिरोदिया, एआरएआयचे संचालक व एसआयएटी २०२६च्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व एसआयएटी २०२६ चे निमंत्रक डॉ. एन. एच. वाळके आणि एआरएआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुमारस्वामी यांच्या हस्ते एआरएआयच्या वतीने टाकावे येथे उभारण्यात आलेल्या इंटेलिजंट मोबिलिटी टेस्ट सीटीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
‘एसआयएटी २०२६’ मध्ये वाहनउद्योग क्षेत्रातील नवनव्या घडामोडींचे प्रदर्शन घडविण्यासोबतच ई-मोबिलिटी, हायड्रोजन फ्युएल सेल आणि हायड्रोजन आयसी इंजिन, सिम्युलेशन अँड मॉडेलिंग, इमिशन मेजरमेंट अँड कंट्रोल टेक्नोलॉजी, अॅडव्हांस व्हेईकल डायनॅमिक्स, अॅक्टीव्ह अँड पॅसिव्ह सेफ्टी, एनव्हीएच, टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन, स्ट्रक्चरल रिलायबिलिटी, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (एडीएएस), अल्टरनेटिव्ह फ्युअल्स, इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स (आयटीएस) अँड रेग्युलेशन्स, टायर टेक्नोलॉजी, आणि मेटेरियल्स अँड मॅन्युफक्चरिंग यांसारख्या प्रमुख विषयांचा समावेश असेल.
भारतीय वाहन उद्योगाची घोडदौड
यावेळी शैलेश चंद्रा यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगात होत असलेल्या जागतिक बदलांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भारत आता जगातील तीन चाकी वाहनांचा सर्वात मोठा उत्पादक आहे, दोन चाकी वाहनांमध्ये पहिल्या दोन देशांमध्ये, प्रवासी वाहनांमध्ये पहिल्या चार देशांमध्ये आणि व्यावसायिक वाहनांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये आहे, तसेच २०२५ मध्ये देशात विक्रमी वाहन निर्यात झाली आहे.
