scorecardresearch

लष्करी सामुग्री निर्यातीत विक्रमी वाढ; संरक्षण क्षेत्रांत सुधारणांचे चांगले परिणाम : नरेंद्र मोदी

मोदींच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रात आपण करत असलेली निर्यात अत्यंत वेगाने वाढत आहे,

india exported military hardware
भारताच्या संरक्षण निर्यातीने २०२२-२३ या आर्थिक वर्षांत आतापर्यंतची सर्वात मोठी निर्यात (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- इंडियन एक्स्प्रेस(file photo)

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण निर्यातीने २०२२-२३ या आर्थिक वर्षांत आतापर्यंतची सर्वात मोठी निर्यात केली आहे. या काळात संरक्षण सामुग्रीची १५ हजार ९२० कोटींची उच्चांकी निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली.

गेल्या काही वर्षांत संरक्षण क्षेत्रातील सुधारणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत, असे नमूद करत नरेंद्र मोदींनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांच्या निर्यातीत आतापर्यंतचा विक्रम झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना सरकारचा कायम पाठिंबा असेल, असे ‘ट्वीट’ त्यांनी केले. यातून देशाच्या प्रतिभेची स्पष्ट अभिव्यक्ती आणि ‘मेक इन इंडिया’ला मिळालेल्या उत्साही प्रतिसाद दिसतो. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील केलेल्या सुधारणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत, असे मोदी म्हणाले. यापूर्वी, २०२१-२२ मध्ये देशाची संरक्षण निर्यात १२ हजार ८१४ कोटी रुपये होती, ती २०२२-२३ मध्ये वाढून १५ हजार ९२० कोटी रुपये इतकी झाली. ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे सांगत राजनाथ सिंह यांनी याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. मोदींच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रात आपण करत असलेली निर्यात अत्यंत वेगाने वाढत आहे, असे त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 02:07 IST

संबंधित बातम्या