भारतातून निर्यात झालेल्या चामडय़ाच्या पट्टय़ांमधून किरणोत्सर्ग होत असल्याच्या तक्रारी आल्याने लंडनमध्ये खळबळ उडाली आहे. फॅशनेबल कपडय़ांचा पुरवठा करणाऱ्या येथील अ‍ॅसॉस या जगप्रसिद्ध कंपनीने हा आरोप केला आहे. ‘अ‍ॅसॉस’कडून वितरित होणाऱ्या कपडय़ांसाठी तसेच अन्य सौंदर्यप्रसाधनांसाठी अनेक देशांतून आयात केली जाते. या कंपनीला भारतातून अनेक वर्षांपासून चामडी पट्टय़ांचा पुरवठा होतो. काही दिवसांपूर्वी पुरवठा झालेल्या या पट्टय़ांमधून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त झाल्याने येथे खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील रॉयल एस्कॉट लेदर या कंपनीने या पट्टय़ांचे उत्पादन केले असून हक इंटरनॅशनलने ते ‘अ‍ॅसॉस’ला निर्यात केले होते. पितळेने मढवलेले हे पट्टे वापरणाऱ्यांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर केलेल्या ‘कोबाल्ट ६०’ या चाचणीत त्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचे उघड झाले, हे पट्टे एकूण ५०० तास वापरल्यास त्या उपभोक्त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे ‘अ‍ॅसॉस’चे म्हणणे आहे. निकृष्ट माल पुरविल्याबद्दल हक इंटरनॅशनलकडे ‘अ‍ॅसॉस’ने एक लाख पौडांच्या दंडाची मागणी केली आहे.
हक इंटरनॅशनलकडून खंडन
आपण पुरवठा केलेल्या पट्टय़ामधून असा प्रकार घडत नसल्याचा दावा ‘हक’ने केला आहे. लंडनमध्ये आमच्या कंपनीचीही प्रयोगशाळा असून त्यात चाचणी केली असता हे पट्टे आरोग्यास घातक असल्याचे दिसून आले नाही, असे हक इंटरनॅशनलने म्हटले आहे.