भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ग्लोबल कोविड परिषदेला संबोधित केलं. जागतिक व्यासपीठावर बोलताना मोदींनी म्हटलं की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबवली गेली. भारतात करोना विषाणूला रोखण्यासाठी ठोस पावलं उचलली. त्यासाठी आम्ही आजपर्यंतचा सर्वात मोठा निधीही जाहीर केला, असंही त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांना संबोधित करताना सांगितलं की, भारतात आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ आणि सुमारे ५० दशलक्ष मुलांचं लसीकरण करण्यात आलं आहे. यासोबतच, भारताने जवळपास ९८ देशांना सुमारे २०० दशलक्ष लसीचे डोस निर्यात केले आहेत. भारतात हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही पारंपरिक औषधं वापरतो. यासोबतच भारतानं कमी किमतीची कोविड टेस्टिंग किटही बनवली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले

मोदींनी पुढे सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेनं मंजूर केलेल्या चार लशी भारत उत्पादित करत आहे. यावर्षी ५ अब्ज लशीचे डोस उत्पादित करण्याची क्षमता भारताकडे आहे. आमच्याकडील जुना औषधोपचार आणि त्याबद्दलचं ज्ञान जगाला उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या महिन्यात आम्ही भारतामध्ये डब्ल्यूएचओ सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची पायाभरणी केली. भविष्य काळातील आरोग्य विषयक संकटांना सामोरं जाण्यासाठी जागतिक स्तरावर समन्वय साधणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना सांगितले की, लस आणि औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जागतिक पुरवठा साखळी (सप्लाई चेन) अधिक लवचीक करणं गरजेचं आहे. WTO चे नियम देखील अधिक लवचिक बनवण्याची गरज आहे. तसेच जागतिक आरोग्य संरक्षण आराखडा तयार करण्यासाठी WHO मध्ये सुधारणा केली पाहिजे, अशी मागणीही मोदींनी यावेळी केली.