India Exports Electricity To Nepal: नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रलंयकारी महापुरात १३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर, अनेकजण बेपत्ता झाले. या महापुरात पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये जलविद्युत पायाभूत सुविधांना फटका बसला असून, नेपाळची अंतर्गत वीज निर्मिती क्षमता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नेपाळला वीज निर्यात करण्यास भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
वीज मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकातून माहिती
भारत सरकारच्या वीज मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत नेपाळ वीज प्राधिकरणाला दररोज १८ तास (रात्री १२:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत) वीज निर्यात करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सरकारने प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय?
“मुजफ्फरपुर – ढळकेबर ४०० केव्ही वाहिनीद्वारे ६०० मेगावॅटपर्यंत आणि टनकपूर – महेंद्रनगर १३२ केव्ही वाहिनीद्वारे ५४ मेगावॅटपर्यंत वीज निर्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जानेवारी २०२७ पासून निर्यात करण्यात येणाऱ्या विजेच्या प्रमाणाचा आढावा डिसेंबर २०२६ मध्ये घेतला जाईल,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नेपाळमधील जलविद्युत पायाभूत सुविधांचे नुकसान
“अलिकडच्या पुरामुळे नेपाळमधील जलविद्युत पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे त्यांची अंतर्गत वीज निर्मिती क्षमता कमी झाली असून विजेची अतिरिक्त गरज निर्माण झाली आहे,” असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नेपाळला या कठीण काळात विजेची गरज भागवण्यास मदत होईल. तसेच, भारत व नेपाळमधील दीर्घकालीन ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत होईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. “नेपाळला सहकार्य करण्यास आणि ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यास भारत कटिबद्ध आहे,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
