India US Trade Deal : भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करारावर काही दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झालं. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अनेकदा भाष्य केलं. एवढंच नाही तर त्यानंतर अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांऐवजी १८ टक्के करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता भारत-अमेरिका व्यापार कराराच्या अनुषंगाने अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री ख्रिस्तोफर लँडौ यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘भारत आणि अमेरिका व्यापार करारामध्ये अमेरिका राष्ट्रीय हीत प्रथम ठेवणार असून आम्ही २० वर्षांपूर्वी चीनशी केलेल्या चुका आता भारतासोबत होऊ देणार नाहीत’, असं ख्रिस्तोफर लँडौ यांनी म्हटलं होतं. दरम्यान, ख्रिस्तोफर लँडौ यांच्या या वक्तव्याला आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘भारताचा उदय दुसरं कोणी ठरवू शकत नाही. भारत स्वतःचा उदय स्वतः करेल’, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री ख्रिस्तोफर लँडौ यांना ठणकावलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर काय म्हणाले?

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री ख्रिस्तोफर लँडौ यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं की, “जागतिक स्तरावर भारताचा उदय इतर देशांच्या चुकांमुळे नव्हे तर स्वतःच्या क्षमतेमुळे होईल. भारताचा उदय भारतच निश्चित करेल आणि तो आपल्या ताकदीने निश्चित केला जाईल, इतरांच्या चुकांनी नाही.”

ख्रिस्तोफर लँडौ यांनी काय म्हटलं होतं?

“अमेरिका भारताबरोबरच्या व्यापार करारामध्ये ‘अमेरिका फर्स्ट’ हेच धोरण अवलंबवणार आहे. भारताबरोबर आर्थिक संबंध आणि व्यापार वाढवताना अमेरिका स्वत:च्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देईल आणि दोन दशकांपूर्वी केलेल्या चुका टाळेल. २० वर्षांपूर्वी आम्ही चीन संदर्भात केलेल्या चुका आता भारतासोबत होऊ देणार नाही. कारण अमेरिकेने तेव्हा आपल्या बाजारपेठा खुल्या केल्या होत्या आणि त्यानंतर विविध क्षेत्रांत चीनने अमेरिकेला मागे टाकलं. त्यामुळे आता अमेरिका फर्स्ट हेच धोरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन राष्ट्रीय हिताला सार्वभौम राज्यांमधील सामायिक तत्व मानतं. जसं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवू इच्छित आहेत. तसेच भारताचे पंतप्रधान किंवा इतर नेत्यांकडून त्यांचे देश पुन्हा महान बनवण्याची अपेक्षा करतील”, असं ख्रिस्तोफर लँडौ यांनी म्हटलं होतं.