जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजासह सारेच सुखावले होते. मात्र जुलै महिना कोरडा जाण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उष्ण कटीबंधीय भागाकडे जाणाऱ्या पावसाला म्हणजेच पूर्वेकडे जाणाऱ्या पावसावर जोरदार हवेमुळे परिणाम होतो. याला वैज्ञानिकीय भाषेत मेडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) या नावाने ओळखले जाते. म्हणजेच पावसाची ३० ते ९० दिवसांतील लहर मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. एमजेओ जेव्हा भारतीय समुद्रातून जात असते तेव्हा भारतात मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो. आता एमजेओने आपली दिशा बदलली असल्याने याचा परिणाम पावसावर होण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसांतच याचा परिणाम दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण खालावले असल्याचे, भारतीय हवामान खात्याचे अधिकारी डी. शिवानंद पै यांनी सांगितले. तसेच ‘अल निनो’ची शक्याताही त्यांनी वर्तविली आहे.
२५ जूनपर्यंत सरासरीच्या २५ टक्के जास्त पाऊस पडला आहे.  भारतातील अनेक ठिकाणी पाऊस कमी झाला आहे. फक्त पूर्वेकडील बिहार, उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात पाऊस बऱ्यापैकी पडत आहे. हे भाग त्या प्रमाणात दुष्काळी भागात मोडतात. एमजेओमुळे दोन आठवडय़ांपूर्वीच मान्सून सर्वत्र पोचला असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर आपण दुष्काळसदृश स्थितीमध्ये प्रवेश करत असल्याचा धोका त्यांनी सांगितला. येत्या जुलै महिन्यात देशात अनेक ठिकाणी पाऊस पडणे विरळ होणार आहे. यामुळे पुढील काही आठवडे कोरडे जाण्याची शक्यता असल्याचे बंगळुरूचे हवामान तज्ज्ञ जे. श्रीनिवासन यांनी सांगितले.