Mumbai Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या-वहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो समोर आला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने या ड्रिम प्रोजक्टच्या ट्रेनचा फोटो प्रसिद्ध केला आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई या दोन महत्वाच्या शहरांना जोडणार आहे. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक ०४ येथे बुलेट ट्रेनचा फोटा लावण्यात आला आहे. या फोटोत बुलेट ट्रेनचे डिझाईन स्पष्टपणे दिसून येत आहे.

बुलेट ट्रेनचा फोटो समोर

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या-वहिल्या नियोजित बुलेट ट्रेनचा फोटो समोर आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक ०४ येथे हा फोटो लावण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने माहिती प्रसिद्ध केली आहे. वेगाने धावणारी ही देशातील पहिली ट्रेनसेवा असणार आहे.

ड्रिम प्रोजेक्ट

मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारी बुलेट ट्रेन मोदी सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपा सरकार पुढील वर्षी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२७ रोजी या ट्रेनसेवेचे लोकार्पण करणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे प्रवास वेळेचे मोठी बचत होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांत गाठता येणार आहे.

समुद्राखालचा रेल्वे बोगदा

राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाच्या वतीने अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन लोहमार्गातील महत्वाच्या बोगद्याबाबत माहिती दिली. बोगद्याचे काम प्रगतीपथावर आल्याचेही प्राधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. २१ किलोमीटर लांबीच्या मुंबई बोगद्याच्या १६ किलोमीटरच्या भागाच्या बांधकामासाठी प्रत्येकी ३००० टनांपेक्षा जास्त वजनाची दोन टीबीएम (टनल बोरिंग मशीन) जोडली जात आहेत. या टप्प्यात ठाणे खाडीखालून जाणाऱ्या ७ किलोमीटर लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा समावेश आहे, हा भारतातील पहिला समुद्राखालचा रेल्वे बोगदा असेल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सहा किलोमीटर लांबीचा बोगदा

बुलेट ट्रेनच्या कामासाठी तैनात करण्यात आलेल्या टनल बोरिंग मशीन देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी मशीन असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. विक्रोळी ते बीकेसीला जोडणाऱ्या सहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे का या मशीनच्या मदतीने हा बोगदा खोदण्यात येईल. हा बोगदा बीकेसी येथील बांधकाम सुरू असलेल्या मुंबई बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचण्यापूर्वी दाट लोकवस्तीच्या शहरी भाग आणि मिठी नदीच्या खालून जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.