पीटीआय, जिंद (हरियाणा)

भारताने स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणार्‍या रेल्वेची शुक्रवारी सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद येथे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यानिमित्ताने भारत हायड्रोजन रेल्वे चालविणार्‍या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. ही रेल्वे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचे यशस्वी उदाहरण असल्याचे मोदी यांनी सांगितले.

जिंद ते सोनीपत या ८९ किलोमीटर मार्गावर धावणारी ही रेल्वे दोन तासांत प्रवास पूर्ण करणार असून, १२ स्थानकांवर थांबणार आहे. ३,२०० अश्वशक्तीची ही जगातील सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे असून, दहा डब्यांची अशी जगातील सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे असल्याचा दावा मोदी यांनी केला. इतर देशांतील हायड्रोजन रेल्वेला तीन ते चार डबे असतात, तर भारताने दहा डब्यांची रेल्वे विकसित करून जगात वेगळी ओळख निर्माण केल्याचे ते म्हणाले.

रेल्वेच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्य आणि तंत्रज्ञान जिंदमध्ये विकसित करण्यात आले असून, भविष्यात हायड्रोजन रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी नवीन कारखाने उभारले जातील, असेही मोदी यांनी सांगितले.

वैशिष्ट्ये

’ इंजिनची क्षमता –

३,२०० अश्वशक्ती

’ डब्यांची संख्या- १०

’ वेग ताशी – ११० किमी

’ प्रवासी क्षमता – २,६००

’ उत्सर्जन – शून्य कार्बन;

केवळ पाण्याची वाफ

’ इंधन तंत्रज्ञान –

हायड्रोजन फ्युएल सेल

१४,७०० कोटींची कामे

या दौर्‍यात मोदी यांनी सुमारे १४,७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यामध्ये ९,६८० कोटी रुपये खर्चाचा १५७.९२ किलोमीटर लांबीचा दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्ग, अंबाला-कालाअंब चौपदरी महामार्गाचा समावेश आहे.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधर येथे अमृतसर-वाराणसी संत रविदास एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी रेल्वेतून प्रवास करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.)