भारतातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेवर दगडफेक झाल्याचा दावा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याबाबत भारतीय रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आलेली ही रेल्वेगाडी हरियाणामधील जिंद आणि सोनीपत दरम्यान धावत आहे. ८९ किलोमीटर लांबीचा हा मार्ग रेल्वेच्या दिल्ली विभागाचा भाग आहे.
व्हिडिओतील रेल्वे हायड्रोजन रेल्वे नाही
रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वेवर प्रवासी स्थानकाच्या फलाटावरून व रुळावर उतरून दगडफेक करत आहेत, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. उत्तर रेल्वेने हा दावा फेटाळून लावला असून हा व्हायरल व्हिडिओ जुना असल्याचा व व्हिडिओतील रेल्वे ही हायड्रोजन रेल्वे नसल्याचे सांगितले आहे. रेल्वे झोनच्या म्हणण्यानुसार व्हिडिओमध्ये दिसणारी रेल्वे ही डब्लूएजी – १२ लोकोमोटिव्हद्वारे चालवली जाते. हायड्रोजन रेल्वे ही तिच्या नियोजित वेळेवर चालत आहे.
जिंद-सोनीपत हायड्रोजन रेल्वेचा क्रमांक, प्रवासाचा कालावधी आणि थांबे
जिंद-सोनीपत हायड्रोजन रेल्वेचा क्रमांक ७४०१०/७४००९ असून ही रेल्वे सुमारे दोन तासांत ८९ किमी एवढे अंतर पार करते. तिचा वेग ७५ किमी/तास आहे. जिंद-सोनीपत हायड्रोजन रेल्वे पांडू पिंडारा मार्गे धावते आणि प्रवासादरम्यान १२ स्थानकांवर थांबते. जिंद शहर, पांडू पिंडारा, ललित खेरा, भांबेवा, ईशापूर खेरी, बुटाना, खंडराई, गोहाना, राभ्रा, लथ, मोहना हरियाणा आणि बरवासनी ही स्थानके आहेत. या स्थानकांमुळे परिसरातील लोकांना या रेल्वेचा लाभ घेता येणार आहे.
जिंद-सोनीपत हायड्रोजन रेल्वेची वेळ
रेल्वे क्रमांक ७४०१० जिंद-सोनीपत हायड्रोजन रेल्वे ही जिंद जंक्शनवरून सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटते आणि सोनीपत स्टेशनला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासाची रेल्वे क्रमांक ७४००९ सोनीपत स्टेशनवरून सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुटते आणि जिंद जंक्शनला दुपारी १ वाजता पोहोचते. जिंद-सोनीपत-जिंद हायड्रोजन रेल्वे, गाडी क्रमांक ७४०१० / ७४००९ ही एकूण ८९ किमी अंतर गाठते, तसेच जिंद ते सोनीपत पोहोचण्यासाठी २ तासांचा कालावधी लागतो.
