मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतातच तयार होत असलेली पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान प्रवास, प्रवासी सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ताशी २८० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी भारतातच बुलेट ट्रेनची निर्मिती केली जात आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथील बीईएमएल (BEML) कारखान्यात या ट्रेनची निर्मिती सुरू आहे. भारतीय परिस्थिती, हवामान आणि प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या ट्रेनची रचना करण्यात आली आहे. या ट्रेनचा चाचणीदरम्यान कमाल वेग ताशी २८० किलोमीटर, तर प्रत्यक्ष परिचालनासाठीचा वेग ताशी २४९ किलोमीटर असणार आहे. संपूर्ण ट्रेनची लांबी सुमारे २०२ मीटर असून, त्यामध्ये आठ डबे असतील. यापैकी चार डबे मोटर कार, तर चार डबे ट्रेलर कार असतील. ट्रेनमध्ये सुमारे ५५७ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. भविष्यात दोन आठ डब्यांच्या ट्रेन एकत्र जोडून १६ डब्यांची ट्रेन चालविण्याचीही सुविधा असेल.

प्रवाशांच्या आरामासह दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी ट्रेनच्या अंतर्गत रचनेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. सात डब्यांमध्ये स्टँडर्ड क्लासची ३×२ आसनव्यवस्था, तर एका डब्यात एक्झिक्युटिव्ह क्लासची २×२ आसनव्यवस्था असेल. आसनांची रचना भारतीय प्रवाशांच्या शारीरिक मापमानाचा विचार करून करण्यात आली आहे. प्रवाशांना पुरेशी पाय ठेवण्याची जागा, प्रत्येक आसनाजवळ मोठ्या खिडक्या, एलईडी दिवे, ओव्हरहेड बॅगेज रॅक आणि मोठ्या सामानासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध असेल. लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर आउटलेटची सुविधाही देण्यात आली आहे. आधुनिक बायो-डायजेस्टर स्वच्छतागृहे, वातानुकूलित डबे आणि डब्यांमधील एकसंध सीलबंद मार्गिका यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येईल. दिव्यांग आणि कमी हालचाल करू शकणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था व सुलभ स्वच्छतागृहांची तरतूद करण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेला प्राधान्य

प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक माहिती मिळावी, यासाठी आधुनिक पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम बसविण्यात आली आहे. डब्यांमधील एलसीडी स्क्रीनवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये माहिती दिली जाईल. स्वयंचलित उद्घोषणा प्रणाली, सार्वजनिक सूचना यंत्रणा आणि आपत्कालीन संवादासाठी टॉक-बॅक युनिट उपलब्ध असतील. वाय-फायच्या माध्यमातून प्रवाशांना पूर्वलोड केलेले मनोरंजन साहित्यही पाहता येईल. ट्रेनच्या दोन्ही टोकांना चालक कक्ष असून, त्यामध्ये इंटेलिजंट ऑन-बोर्ड कंट्रोल सिस्टीम असेल. ही प्रणाली चालकाला निर्णय घेण्यासाठी आणि नियंत्रण केंद्राशी समन्वय साधण्यासाठी मदत करेल.

ऊर्जा बचत, कमी आवाज आणि एरोडायनॅमिक रचना

या बुलेट ट्रेनमध्ये प्रवाशांना शांत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. प्रत्येक डब्यात दोन एचव्हीएसी युनिट्स असून, तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवली जाईल. डब्यांच्या बॉडी आणि जमिनीमध्ये ध्वनिरोधक व्यवस्था, आवाज कमी करणारे विशेष कोटिंग तसेच बोगी कव्हर आणि स्कर्ट्स बसविण्यात आले आहेत. ट्रेन २५ केव्ही, ५० हर्ट्झ सिंगल फेज एसी विद्युत प्रणालीवर धावेल. ब्रेक लावताना ऊर्जा पुन्हा मिळविणारी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली वापरण्यात आली आहे. ट्रेनचा पुढील भाग आणि संपूर्ण बॉडीची रचना कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (CFD) तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे हवेचा विरोध कमी होण्यास, बोगद्यांमधील दाबातील बदल नियंत्रित करण्यास आणि हवेच्या प्रवाहामुळे निर्माण होणारा आवाज कमी करण्यास मदत होईल.