नवी दिल्ली : भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान नवउद्यम कंपनी ‘गॅलॅक्सआय’ने रविवारी ‘मिशन दृष्टी’ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळील वँडेनबर्ग येथून ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन-९ या रॉकेटमधून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

१९० किलोग्रॅम वजनाचा ‘मिशन दृष्टी’ हा भारताचा सर्वात मोठा खासगीरीत्या विकसित केलेला पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार  हा उपग्रह जगातील पहिला ऑप्टो-एसएआर उपग्रह आहे, जो इलेक्ट्रो- ऑप्टिकल (ईओ) आणि सिंथेटिक ॲपर्चर रडार (एसएआर) सेन्सरना एकाच ऑपरेशनल प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करतो. ईओ सेन्सर सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाशात उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा टिपतात, तर एसएआर सेन्सर रडार पल्सेसचा वापर करून सर्व हवामानात आणि दिवस-रात्र प्रतिमा घेण्याची क्षमता प्राप्त होते. 

बंगळूरुस्थित ‘गॅलॅक्सआय’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुयश सिंह यांनी ‘मिशन दृष्टी’चे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘‘ही आमची पहिली मोहीम असून हे अभूतपूर्व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पाच वर्षांहून अधिक काळ केलेल्या अथक संशोधन आणि विकासाचे हे फलित आहे. उपग्रह आता यशस्वीपणे कक्षेत स्थापित झाल्यामुळे आमचे लक्ष आता त्याच्या पुढील कामकाजावर असेल,’’ असे ते म्हणाले.

दृष्टिक्षेपात ‘मिशन दृष्टी’

वजन : १९० किलो

खासगीरित्या विकसित केलेला भारताचा सर्वात मोठा उपग्रह

जगातील पहिला ‘मल्टी-सेन्सर’ पृथ्वी निरीक्षण उपग्रह.

कोणतेही हवामान, दिवस-रात्र किंवा अंधारातही पृथ्वीची स्पष्ट छायाचित्रे घेण्याची क्षमता.

संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सागरी देखरेख आणि पायाभूत सुविधा नियोजन यांसारख्या विविध क्षेत्रांत उपयोगी. गॅलेक्सआयचे ‘मिशन दृष्टी’ हे भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतील मोठे यश आहे.

जगातील पहिल्या ऑप्टो-एसएआर उपग्रहाचे आणि देशातील सर्वात मोठ्या खासगी बनावटीच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे देशातील तरुणांच्या नवोन्मेष आणि राष्ट्रउभारणीच्या उत्साहाचा दाखला आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान