India On Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे आज इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराण हादरलं आहे. इराणच्या अनेक शहरात मोठे स्फोट झाल्यामुळे इराणच्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. तर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत प्रतिहल्ले केले आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील या संघर्षावर आता भारताने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य करत अमेरिका, इस्रायल आणि इराण अशा सर्वांना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आणि संवाद व राजनैतिकतेद्वारे तणाव सोडवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?
“आम्ही सर्व बाजूंना संयम बाळगण्याचं, संघर्ष टाळण्याचं आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन करतो. तणाव कमी करण्यासाठी आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्ग अवलंबला पाहिजे. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे”, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, “इराण आणि आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींबद्दल भारत चिंता व्यक्त करत आहे. आम्ही सर्व पक्षांना संयम बाळगण्याचं, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन करत आहोत.”
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू काय म्हणाले?
इस्रायल आणि इराणमधील या युद्धाच्या घडामोडीबाबत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, “एक तासापूर्वी इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील दहशतवादी राजवटीने निर्माण केलेल्या अस्तित्वाच्या धोक्याचं उच्चाटन करण्यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं त्यांच्या ऐतिहासिक नेतृत्वाबद्दल आभार मानतो. या खुनी दहशतवादी राजवटीला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी देता कामा नये. ज्यामुळे ते संपूर्ण मानवतेसाठी धोका बनू शकते”, असं नेतान्याहू यांनी म्हटलं.
‘तुमचे सरकार ताब्यात घ्या’, ट्रम्प यांचे इराणी जनतेला आवाहन
इराणची राजधानी तेहरानवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. आज सकाळी इराणच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्यांनी या हल्ल्यामागे अमेरिका आणि इस्रायल यांचा सहभाग असल्याचं मान्य केलं. ट्रुथ सोशल मीडियावर ट्रम्प यांनी एक सविस्तर व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्यांनी इराणी जनतेलाही आवाहन केलं.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “तुमच्या स्वातंत्र्याची वेळ जवळ आली आहे. युद्धादरम्यान सुरक्षित स्थळी आश्रय घ्या. तुमच्या घरातून बाहेर पडू नका. बाहेर सध्या धोका असेल. सर्वत्र बॉम्बचा वर्षाव होत असेल. जेव्हा आमचा हल्ला पूर्ण होईल. तेव्हा तुम्ही तुमचे सरकार ताब्यात घ्या. ते तुमचे स्वतःचे सरकार असेल.”
