नवी दिल्ली : ‘‘पीआरमुळे जीडीपीचे चमकदार चित्र सादर करता येईल, पण अर्थव्यवस्थेला चमक आणता येणार नाही,’’ अशी टीका काँग्रेसने केंद्र सरकारवर केली आहे. माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी जीडीपी दरवाढीबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेला राजकीय वाद बुधवारी आणखी वाढला.
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर ७.८ टक्के नोंदवला गेल्याचे केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केले. मात्र, माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारचा दावा खोडून काढला. सरकारने गेल्या वर्षीच्या जीडीपीमध्ये सहा लाख कोटी रुपयांनी सुधारणा केली असून त्यामुळे या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी जवळपास १०.३ टक्क्यांनी वाढला आहे, असे गर्ग यांनी वाहिन्यांना सांगितले. ‘‘जर त्यांनी गेल्या वर्षाचा जीडीपी सुधारित केला नसता तर सध्याच्या दरांनुसार जीडीपी दरवाढ २.६ टक्के राहिली असती,’’ असे गर्ग यांनी नमूद केले.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी गर्ग यांच्या टिप्पणीची ध्वनिचित्रफीत ‘एक्स’वर प्रसिद्ध करत केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेसच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनीही केंद्राला लक्ष्य केले. गर्ग यांचे मूल्यांकन हे वाढती महागाई, घटती क्रयशक्ती, कमी होणारे उत्पादन आणि बचत, कुंठित रोजगार संधी आणि कुटुंबांवरील वाढते कर्ज या वास्तवाच्या अधिक जवळचे आहे, असे खेरा यांनी ‘एक्स’वर लिहिले.
वास्तव स्वीकारण्याची सूचना
जयराम रमेश यांनी आवाहन केले की, सरकारने आर्थिक परिस्थिती मान्य करावी आणि त्यानंतर सुधारणा हाती घ्याव्यात. तरुणांसाठी नोकर्या निर्माण कराव्यात; मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योग आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावे; मागणी आणि उत्पन्नात वाढ व्हावी; आर्थिक विषमता कमी व्हावी आणि कुडमुड्या भांडवलशाहीला प्रोत्साहन देण्याऐवजी निष्पक्ष स्पर्धा असावी.
मग नागरिकांचे जगणे महाग का?- सुप्रिया सुळे
ठाणे : महागाई, बेरोजगारी आणि वाढता घरखर्च यामुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढले तर, नागरिकांचे जगणे महाग का झाले, असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. दूध १०० रुपयांच्या पुढे गेले आहे. सामान्य माणसाने जगायचे कसे, हे सरकारने सांगावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विरोधक नशेत आहेत का?
जीडीपी वाढीवर काँग्रेसने शंका उपस्थित केल्यावरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘‘विरोधी पक्ष नशेत आहे का की त्यांचा वास्तवाशी संबंध तुटल्यामुळे ते भारताच्या प्रगतीचा आंधळा द्वेष करत आहेत,’’ असा प्रश्न त्यांनी ‘एक्स’वरून विचारला. केरळ काँग्रेसने जीडीपीचे आकडे बनावट आहेत, असा दावा करताना खोट्या कथनांवर आता कोणीही विश्वास ठेवत नाही, असे ‘एक्स’वर लिहिले होते.त्यावर रिजिजू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी सरकारच्या दाव्याचा फुगा फोडला आहे. जीडीपी वाढीचा दर २.६ टक्के आहे, ७.८ टक्के नाही असे त्यांचे मूल्यांकन आहे. आम्हाला अर्थव्यवस्था मजबूत व्हायला हवी आहे. पण खोट्या आकड्यांच्या आधारे अर्थव्यवस्था मजबूत होत नाही, तर सत्याचा स्वीकार केल्याने होते. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
