कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-इराण संघर्षासारख्या गंभीर जागतिक घडामोडींनंतरही भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) भारताचा विकास दर (जीडीपी) ७.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि अनेक आघाडीच्या अर्थतज्ज्ञांच्या ७ ते ७.१ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सेल्फी व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

देशभरातली नागरिकांचं अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “७.८ टक्के प्रगती. देशात आनंदी-आनंद झाला आहे. नागरिकांच्या संकल्पशक्ती आणि त्यांच्या पुरुषार्थासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. हे सामूहिक शक्तीचं प्रतिबिंब आहे.”

विरोधकांवर टीका करत काय म्हणाले नरेंद्र मोदी?

जागतिक संघर्षाच्या काळातही भारताने आपली प्रगती कायम ठेवली आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जग युद्धात अडकलेला आहे, चहूबाजूंनी युद्धाच्या बातम्या येत आहेत. जग संकटात सापडलं आहे. पुरवठा साखळी कोलमडली आहे. २०२० च्या करोना काळापासून आतापर्यंत कुठेच स्थिरता दिसत नाहीय. तरीही भारत वेगाने प्रगती करत आहे. दुसरीकडे, भारताच्या आत निराशेच्या गर्तेत अडलेले लोक झुठ की गुंज चारही बाजूंना पसरवत आहेत. या सर्वांना पार करत, देशाने ७.८ टक्के प्रगती प्राप्त केली आहे.”

स्वदेशीचा नारा, विदेशी पर्यटन टाळा, सोनं खरेदीही टाळा- मोदींचं आवाहन

“आपल्याला ही गती कायम ठेवायची आहे आणि वाढवायचीही आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत बनवणं फार गरजेचं आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा भारतीयांना स्वदेशीचा मंत्र देत व्होलक फॉर लोकल राहण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “स्वदेशीचा मंत्र, व्होकल फॉर लोकल, विदेशी यात्रा करू नका, विदेशात लग्न करू नका, मेड इन इंडियाच्या मंत्राला जगलं पाहिजे. गरज नसेल तर सोनंही खरेदी करू नका. आपण जितकं जास्त स्वदेशीला भर देऊ, आत्मनिर्भरतेला भर देऊ”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

“मला खात्री आहे की जेव्हा स्वातंत्र्याचे १०० वर्षे होतील, आम्ही आमच्या युवापिढीला विकसित भारत सुपूर्द करू. युवा पिढीच्या स्वप्नांना आपल्या आजच्या परिश्रमातून आपण साकार करू. याकरता आपण पुरुषार्थात काहीही कमी करणार नाही. आपली निती आणि नियत स्वच्छ आहे. १४० कोटी लोकांची शक्ती आज एकजूट होऊन, नवी उंचीवर घेऊन जात आहे. आनंदही साजरा करा आणि संकल्पही बनवा. संकल्पाला सिद्ध करण्याकरता माझ्याबरोबर चालूया”, असं मोदी म्हणाले.