Bangladesh Army Chief Wacker-us-Zaman : बांगलादेशमध्ये अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना यांनी २०२३ साली जनरल वकेर-उझ-झमान यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली होती. मात्र भारताचया राष्ट्रीय सुरक्षा समितीने त्यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती करू नये, असा सल्ला शेख हसीना यांना दिला होता. भारताचा सल्ला वेळीच ऐकला असता तर शेख हसीना यांच्यावर आज ही वेळ आली नसती, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, भारताच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी २०२३ साली जनरल वकेर-उझ-झमान यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यापूर्वी शेख हसीना यांना त्यांच्या चीनधार्जिण्या भूमिकेबाबत इशारा दिला होता. बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून विद्यार्थी आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन तेव्हाच शमविण्याऐवजी लष्करप्रमुख झमान यांनी पतंप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या बहिणीसह देश सोडण्याचा सल्ला दिला. शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या खालिदा झिया यांना ताबडतोब तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयामुळे जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्रशिबिर यासारख्या कट्टर इस्लामी संघटना आता देशाचा ताबा घेऊ शकतील, असेही सांगितले जात आहे. हे वाचा >> बांगलादेश संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींनी मांडली भूमिका; म्हणाले, "राष्ट्रीय हितासाठी…" शेख हसीना यांनी भारतातील त्यांच्या हितचिंतकांना एप्रिल २०२३ मध्येच जानेवारी २०२४ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले होते. मात्र पक्षातील समर्थकांनी आग्रह केल्यानंतर त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. कट्टर इस्लामवाद्यांकडून आपल्याला धोका आहे, याची जाणीव शेख हसीना यांना आधीच झाली होती, त्यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबातील कुणालाही राजकीय वारसदार म्हणून पुढे आणले नव्हते. त्यांना कदाचित मारले जाईल, अशी त्यांना भीती वाटत होती. कट्टर इस्लामवाद्यांविरोधात शेख हसीना ठामपणे उभ्या होत्या, असे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. हे ही वाचा >> शेख हसीना यांनाही जमलं नाही, ते करू धजावणारे बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान कोण आहेत? हिंदुस्तान टाइम्ससाठी शिशिर गुप्ता यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले की, शेख हसीना यांनी ढाकातून पाय काढला असला तरी भारत आपल्या जुन्या मित्राला एकटा सोडणार नाही. शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर लष्कर, उत्साही कट्टरपंथी हे उन्मादाचे प्रदर्शन करत असले तरी बांगलादेशही पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदिव या देशांप्रमाणेच आर्थिक संकटाच्या वाटेवर आहे. त्यांना यातून मार्ग काढण्यासाठी पाश्चिमात्य देशातील आर्थिक संस्थांवर अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेशमधील बेरोजगारीचा दर लक्षात घेता विद्यार्थी आंदोलक लष्कराच्याही विरोधात जाऊ शकतात, असेही सांगितले जाते.