IRIS Dena sinking news : बहुपक्षीय नौदल युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतात आलेली इराणची युद्धनौका ‘आयआरआयएस देना’ (IRIS Dena) परतत असताना ४ मार्च रोजी अमेरिकेने टॉर्पेडो हल्ला करून ती बुडवली. या अमेरिकन हल्ल्यात १०० हून अधिक खलाशी मारले गेले. ही घटना भारताच्या प्रभावक्षेत्रात घडल्याने आणि ही युद्धनौका विशाखापट्टणम येथून परतत असल्याने भारतात तीव्र वाद निर्माण झाला होता. मात्र, इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताली यांच्या वक्तव्याने या वादावर पडदा पडला आहे.

मी फक्त भारत आणि इराणविषयी बोलेन

शनिवारी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये भारत आणि श्रीलंकेकडून मिळालेल्या मदतीबाबत विचारले असता मोहम्मद फताली म्हणाले, “भारत सरकारने आम्हाला खरोखरच मोठी मदत केली आहे. मला फक्त इराण आणि भारताविषयी बोलू द्या. मी भारताचा इराणी राजदूत आहे, त्यामुळे मला तुम्ही उल्लेख केलेल्या तिसऱ्या देशाबद्दल (श्रीलंका) बोलायचे नाही. एक राजदूत म्हणून मी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहिले पाहिजे.”

इराण प्रत्युत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही

ते पुढे म्हणाले, “या जहाजांच्या बाबतीत भारत सरकारने आम्हाला मोलाची मदत केली. त्यांनी आमची विनंती मान्य केली. दुर्दैवाने, इतर काही देशांनी सहकार्य करण्यास नकार दिला. या सर्व प्रकारानंतर आम्ही त्यांना नक्कीच प्रत्युत्तर देऊ आणि त्याचा काही भाग आम्ही पूर्ण केला आहे. तुम्हाला लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल. इराण कोणतीही कारवाई प्रत्युत्तराशिवाय सोडत नाही,” असेही इराणी राजदूतांनी स्पष्ट केले.

एकीकडे ‘आयआरआयएस देना’वर हल्ला झाला असतानाच, भारताने ४ मार्च रोजी इराणच्या ‘आयआरआयएस लावन’ (IRIS Lavan) या दुसऱ्या युद्धनौकेला कोचीमध्ये आश्रय दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने ‘आयआरआयएस लावन’वरील अनावश्यक कर्मचारी मायदेशी पाठवले आहेत. जहाजावरील १८३ कर्मचाऱ्यांपैकी ५० हून अधिक कर्मचारी अद्याप कोचीमध्येच थांबलेले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच या दोन्ही युद्धनौका प्रवासासाठी निघाल्या होत्या.