India Sri Lanka Fuel Aid: India steps in to resolve Sri Lanka’s energy shortage caused by the Middle East conflict : अमेरिका-इस्रायल आणि इराण याच्यात पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. यादरम्यान भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेत श्रीलंकेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. श्रीलंकेतील ऊर्जा संकटाच्या काळात भारताने श्रीलंकेत इंधन पाठवल्याबद्दल श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी रविवारी भारताचे आभार मानले आहेत.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताकडून श्रीलंकेला ३८ हजार मेट्रिक टन इंधन मिळाल्याचे म्हटले आहे.
“पश्चिम आशियातील संघर्षामुळे श्रीलंकेला सामना करावा लागत असलेल्या इंधन पुरवठ्यातील अडथळ्यांबाबत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. भारताने तात्काळ दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे. काल ३८००० मेट्रिक टन इंधन कोलंबोमध्ये दाखल झाले. समन्वय साधल्याबद्दल परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचेही आभार मानतो,” असे दिसानायके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली होती.
कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, श्रीलंकेला यापूर्वी पश्चिम आणि सिंगापूर येथूल इंधनाचा पुरवठा होत होता. मात्र पश्चिम आशियातील संघर्षामुळे या इंधन पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
श्रीलंका आयओसी यांचे ज्या पुरवठादरांबरोबर करार आहेत त्यांनी अमेरिका-इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने आपण इंधन पुरवठा करू शकत नसल्याचे म्हटले आहे.
वर नमूद केलेल्या अडथळ्यांमुळे, भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून (IOCL) आपत्कालीन मदत पुरवठा करण्याची विनंती करण्यात आली होती. सध्या कोलंबोत दाखल झालेला ३८००० मेट्रिक टन इंधनाचा साठा हा याच मदतीचा एक भाग आहे. इंधन पुरवठ्यात सातत्य राखण्यासाठी भारत सरकारने लंका आयओसीच्या (Lanka Indian Oil Corporation) माध्यमातून श्रीलंकेला ही मदत दिली आहे, असे उच्चायुक्तालयाने निवेदनात म्हटले आहे.
निवेदनानुसार, पाठवण्यात आलेल्या ३८ हजार मेट्रिक टन इंधनापैकी २० हजार मेट्रिक टन डिझेल आणि १८ हजार मेट्रिक टन पेट्रोल आहे.
