Gold and Silver prices to rise as Modi Government increases Import Duty: परकीय चलनावरील ताण आणि आयात बिल कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी काही दिवस टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने बुधवारी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले आहे. याआधी आयातशुल्क ६ टक्के होते. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क ६.४ टक्क्यांवरून १५.४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आयातशुल्कात वाढ केल्यामुळे भारतातील सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातून भारताची व्यापार तूट नियंत्रणात आणण्यास आणि रुपयाला आधार देण्यात यामुळे मदत होऊ शकते.

तथापि आयात शुल्क वाढीमुळे सोन्याची तस्करी पुन्हा वाढू शकते, अशी चिंता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ९५.७५ च्या निचांकी पातळीवर झाली आहे. ही घसरण रोखणे, मौल्यवान धातूंची आयात रोखणे आणि व्यापारी तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने १० टक्के मूलभूत सीमा शुल्कासह ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू केला आहे. यामुळे एकूण आयातशुल्क १५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सोने आणि चांदीचे नवे ऐतिहासिक दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जूनच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचे दर ६ टक्क्यांनी म्हणजेच ९,२०६ रुपयांनी वधारून १,६२,६४८ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या किमतीतही प्रति किलो १६,७४३ रुपयांची प्रचंड वाढ झाली असून, चांदी आता २,९५,८०५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

सरकारच्या ‘त्या’ आवाहानानंतरही वाढ

पंतप्रधान मोदी यांनी सोने आणि चांदीची खरेदी काही दिवस टाळण्याचे आवाहन केल्यानंतर यावरील आयातशुल्क वाढवले जाणार का? अशी एक चर्चा सुरू झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला रॉयटर्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने बातमी देताना म्हटले होते की, सरकारचा आयातशुल्क वाढविण्याचा कोणताही विचार नाही. मात्र त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे.

PM Modi Gold Purchase Appeal to save foreign exchange
सोन्याची आयात अन् रुपयाची घसरण: काय आहे संबंध? (AI Generated Image)

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याची आयात करणारा सर्वात मोठा देश आणि चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. सोने आणि चांदीचे भाव आधीच वाढलेले असताना आता आयातशुल्क वाढीमुळे विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारातील परतावा कमी होणे आणि सोन्याचा दर वाढल्यामुळे गेल्या वर्षीपासून सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाली होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार, मार्च तिमाहित गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड्स (ETFs) मधील गुंतवणूक १८६ टक्क्यांनी वाढून ती २० मेट्रिक टनपर्यंत वाढली होती.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी इंडिया टुडेला प्रतिक्रिया देताना म्हटले की, केंद्र सरकारने अपेक्षेप्रमाणे चालू खात्यातील तूट रोखण्यासाठी आयातशुल्कात वाढ केली. मात्र याचा परिणाम आता मागणीवर होऊ शकतो.

पंतप्रधान मोदींचे काटकसरीचे आवाहन

मध्य पूर्वेतील इराण – अमेरिका संघर्षामुळे संपूर्ण जगाला आर्थिक परिणाम भोगावे लागत आहेत. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडत असल्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी देश सज्ज होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतातील नागरिकांना व्यावहारिक काटकसरीचे उपाय अवलंबण्याचे आवाहन केले.

Gold and Silver Prices
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्यावरील आयात शुल्कात तब्बल १५ टक्केपर्यंत वाढ केली (छायाचित्र – Indian Express)

पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेल्या उपायांमध्ये लग्नसमारंभांसाठी सोन्याची खरेदी करणे एका वर्षासाठी टाळण्याचे आवाहन केले होते. याशिवाय पर्यटनासाठी परदेशातील प्रवास टाळा, जिथे शक्य असेल तिथे घरून काम करा. सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा, असेही त्यांनी म्हटले होते.

सोने, चांदी दरवाढीचे कारण?

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावात काही प्रमाणात नरमाई आल्याच्या संकेतांमुळे जागतिक बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याचा थेट परिणाम सोने, चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण, डॉलरमधील चढती आणि जागतिक गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.