भारतातही पाण्याची समस्या उद्भवली असून, काही भागांत पाण्याचा तुटवडय़ामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही राज्यांत भूगर्भातील पाण्याने धोक्याची पातळी गाठली असल्याचे केंद्रीय जलसंपदामंत्री हरिश रावल यांनी बुधवारी सांगितले. दुसऱ्या आशिया पॅसिफिक पाणी परिषदेच्या अनुषंगाने पाणी हे सामाजिक स्रोत या विषयावर त्यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधला. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि वायव्यकडील भागात भूगर्भातील पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. ८० टक्के भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. काही भागात तर यापेक्षाही जास्त पाणी वापरले जात आहे. यावर उपाय म्हणून पाण्याची साठवण क्षमता वाढविणे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे यावर भर देणे अपेक्षित आहे. तसेच ज्या भागांत जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणच्या पुराचे पाणी तुटवडा असलेल्या भागात वळविण्यात शक्य झाल्यास तेथील पाणी समस्येवर चांगला उपाय होऊ शकतो, असे रावत यांनी स्पष्ट केले. पाण्याचे दुर्भिक्ष असलेले राज्य या प्रश्नांकडे आता गांभीर्याने पाहात असून पाण्याच्या प्रकल्पांची आखणी करताना नदीखोऱ्यांचा तपशीलवार विचार केला जात आहे. तसेच पाण्याचे सिंचन करताना अत्याधुनिक यंत्रणेच्या वापरावर भर देणे, पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.