india indonesia brahmos deal: भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमधील धोरणात्मक आणि राजनैतिक संबंधांनी आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. संरक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला तो जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र असलेल्या ‘ब्रह्मोस’ खरेदीचा करार! या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातील भागीदारीला मोठी ताकद मिळाली आहे.
या ऐतिहासिक भेटीदरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंगतांग आदिपूर्णा’ प्रदान करून त्यांचा गौरव केला.
पंतप्रधान मोदींचा ‘जकार्ता’त अभूतपूर्व सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर असून, त्यांचा हा इंडोनेशिया दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. जकार्ता येथील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका भव्य शासकीय सोहळ्यात पंतप्रधानांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान प्रदान करताना राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो म्हणाले,”इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच आज दोन्ही देशांमधील संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. हा आमच्या प्रजासत्ताकाचा सर्वोच्च सन्मान असून, तो भारत आणि इंडोनेशियामधील प्राचीन सांस्कृतिक ऋणानुबंध आणि अतूट विश्वासाचे प्रतीक आहे.”
पंतप्रधान मोदींनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना, हा गौरव १४० कोटी भारतीयांचा असल्याचे सांगत इंडोनेशियाचे राष्ट्रपती आणि जनतेचे आभार मानले.
लढाऊ विमानांची सलामी आणि जंगी स्वागत
पंतप्रधान मोदींचे इंडोनेशियाच्या भूमीवर आगमन होताच त्यांचे अत्यंत अभूतपूर्व आणि राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले.
- आकाशात थरार: पंतप्रधान मोदींचे विमान इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच, इंडोनेशियाच्या हवाई दलाच्या ‘एफ-१६’ आणि ‘सुखोई’ लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला हवेतच वेढा घालत सुरक्षा आणि विशेष मानवंदना दिली.
- राजशिष्टाचार बाजूला: सर्व प्रोटोकॉल बाजूला सारत राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो स्वतः पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानाच्या पायऱ्यांशी उपस्थित होते. त्यांनी मोदींना कडकडून मिठी मारली.
- तोफांची सलामी: यावेळी ६ तोफांच्या सलामीनं जकार्ताचा परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रपती भवनात पारंपरिक पद्धतीने घोडदळ आणि लष्कराच्या तुकडीने पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारासह ‘हे’ महत्त्वाचे करार
या दौऱ्यात भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण आणि आर्थिक क्षेत्राला गती देणारे अनेक महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले:
- संरक्षण क्षेत्र (Defence Sector): इंडोनेशिया भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करणार आहे. यासोबतच भारताची ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ (BDL) आणि इंडोनेशियाची ‘रिपब्लिकॉर्प’ यांच्यात हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांबाबत महत्त्वपूर्ण करार झाला.
- उद्योग आणि तंत्रज्ञान: भारताची सरकारी कंपनी ‘सेल’ आणि इंडोनेशियाच्या ‘पीटी क्रॅकाटाऊ स्टील’ यांच्यात स्टील पुरवठा साखळीसाठी संयुक्त भागीदारी जाहीर करण्यात आली.
- इतर क्षेत्र: आपत्ती व्यवस्थापन, कृषी, दूरसंचार, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय उत्पादनांचे नियमन या क्षेत्रांतही सहकार्य वाढवण्यावर एकमत झाले.
- सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण: ‘आयआयएम बेंगळुरू’ आणि इंडोनेशियाच्या शैक्षणिक संस्थेत करार झाला. तसेच, इंडोनेशियातील ऐतिहासिक ‘प्रंबनन हिंदू मंदिर’ परिसराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी भारताने पुढाकार घेतला आहे.
मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा
जकार्ता येथील आपले सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आणि योग्याकर्ता येथील ऐतिहासिक ‘प्रंबनन हिंदू मंदिर’ संकुलाला भेट दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी मेलबर्नकडे रवाना होतील.
