Iran Message to India : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ले केले आहेत. या युद्धसदृष्य परिस्थिती भारताने अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. असं असतानाच इराणने आता भारताकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. सध्या ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे भारताने पत्रक काढून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवावा अशी मागणी इराणने केली आहे. यामुळे भारत एका मोठ्या राजनैतिक पेचप्रसंगात सापडला आहे, कारण भारताने आतापर्यंत या संघर्षात कोणत्याही एका बाजूची पाठराखण केलेली नाही. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले करायला सुरुवात केली तेव्हा इराणनेही त्यांना प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांवर हल्ले केले. परिणामी आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा धोक्यात आली. त्यामुळे या संघर्षात फटका बसलेल्या देशांच्या नेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला असून हल्ल्यांचा निषेध नोंदवला. तसेच तिथल्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.

गुरुवारी रात्री मोदींनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली. वाढता तणाव आणि नागरी जीवितहानीबद्दल त्यांनी ‘गंभीर चिंता’ व्यक्त केली. त्यांनी ‘संवाद आणि मुत्सद्देगिरी’चा आग्रह धरत शांततेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. एस. जयशंकर यांनीही त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अरागची यांच्याशी चर्चा केली. इराणने भारताला या संघर्षात ब्रिक्सच्या माध्यमातून ‘रचनात्मक भूमिका’ बजावण्याचे आणि लष्करी आक्रमणाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

ब्रिक्समधील गुंतागुंत

ब्रिक्समध्ये आता इराणसोबतच सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या देशांचाही समावेश आहे, जिथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. या परस्परविरोधी हितसंबंधांमुळे भारताला सर्वांची बाजू सांभाळणे कठीण जात आहे.

भारत २०२६ सालासाठी ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत असून, या वर्षाच्या उत्तरार्धात ब्रिक्स नेत्यांची शिखर परिषद भारतात होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, इराणला भारताकडून इस्रायल आणि अमेरिकेविरोधात कडक भूमिकेची अपेक्षा आहे, तर भारत ‘शांतता आणि स्थिरता’ या मुद्द्यावर भर देऊन तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहे.