अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा पाचवा आठवडा सुरू आहे. हा संघर्ष कधी थांबणार याकडे सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यादरम्यान भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी सोमवारी भारत सरकारकडून करण्यात आलेल्या संवाद आणि संयम राखण्याच्या आवाहनाचे कौतुक केले आहे. सध्याच्या परिस्थितीत भारतासारखे देश एक अत्यंत प्रभावी भूमिका बजावू शकतात, असेही ते म्हणाले.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत, फताली यांनी भारताची भूमिका कौतुकास्पद आणि जबाबदार असल्याचे म्हणाले. तसेच, वाढत्या तणावाच्या परिस्थितीत भारत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, अशी शक्यता इराणला वाटते, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
इराणला जागतिक महासत्तांसह अपेक्षा
तसेच इराणचे राजदूत म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईचा सर्व सर्व स्वतंत्र आणि स्वातंत्र्याची मागणी लावून धरणाऱ्या देशांनी स्पष्टपणे निषेध करावा, अशी इराणची अपेक्षा आहे.
या कारवायांनी इराणचे सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे आणि त्यांनी शाळा, रुग्णालये, निवासी भाग आणि आर्थिक मालमत्ता अशा नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी हा संघर्ष इराणने सुरू केला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
“आम्ही कधीही युद्धाचा आग्रह धरलेला नाही,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, इराणची नेहमीच भूमिका राहिली आहे की ते स्वत:हून युद्धाची सुरुवात करणार नाहीत. मात्र, त्यांनी असा इशाराही दिला की, जर युद्ध लादले गेले, तर वेळ, व्याप्ती आणि भौगोलिक सीमा याबाबतीत त्याचा शेवट कसा होईल यासंदर्भातील अटी या सर्वस्वी इराणच्या हातात असतील. यावेळी त्यांनी इराणचे सध्याच्या वर्तन हे बाह्य आक्रमनाच्या विरोधात रास्त ठरणारे आत्मसंरक्षण असल्याचे ते म्हणाले.
मध्यपूर्वेतील संघर्ष शिगेला
मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चे गुप्तचर प्रमुख मेजर जनरल मजीद खादेमी यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनेया वृत्ताची पुष्टी केली आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, आयआरजीसीने आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात खादेमी ठार झाल्याची घोषणा केली आहे. तर, या हल्ल्याबाबत इस्रायलकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे प्रयत्न किती यशस्वी होतात याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित केले जात आहेत. या ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर इराणने वेगळीच भूमिका घेतली आहे. शस्त्रसंधी तात्पुरती असेल तर होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार, असे इराणने म्हटले आहे.
