India monitors Iran Israel conflict closely ensuring Gulf Indians : इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू केले आहेत. २८ फेब्रुवारीपासून या तिन्ही देशांनी एकमेकांविरोधात युद्ध छेडल्याने जगभरातील नागरीक भयभीत झाले आहेत. इराणने प्रत्युत्तरादाखल आखाती देशांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा धोक्यात आल्याचं सांगून या तिन्ही देशांनी संयमाने निर्णय घ्यावा आणि हा संघर्ष लवकरात लवकर थांबवावा, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. याबाबत, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने आज परिपत्रक जारी केलं.

रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती खालावली

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, “२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण आणि आखाती प्रदेशात सुरू झालेल्या संघर्षाबद्दल आम्ही आमची तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्या वेळीही भारताने सर्व बाजूंनी संयम बाळगावा, तणाव वाढवणे टाळावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले होते. दुर्दैवाने, रमजानच्या पवित्र महिन्यात या प्रदेशातील परिस्थिती लक्षणीय आणि सातत्याने खालावली आहे.”

शेजारी देश म्हणून चिंता वाटतेय

“गेल्या काही दिवसांत हा संघर्ष फक्त वाढलाच नाही तर इतर देशांतही पसरला आहे. विनाश आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे जनजीवन आणि आर्थिक गुंतवणूक ठप्प झाली आहेत. या क्षेत्राची सुरक्षा आणि स्थैर्य यामध्ये आमचे महत्त्वपूर्ण हितसंबंध गुंतलेले असल्याने आणि एक जवळचा शेजारी म्हणून या घडामोडींमुळे मोठी चिंता निर्माण होत आहे”, असंही भारताने म्हटलं आहे.

एक कोटी भारतीय आमची प्राथमिकता

“आखाती प्रदेशात जवळपास एक कोटी भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. त्यांची सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या कोणत्याही घडामोडीकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. आमचा व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी देखील याच भूभागातून जाते. कोणत्याही मोठ्या व्यत्ययाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात. ज्या देशाचे नागरिक जागतिक कार्यबलात आघाडीवर आहेत, असा देश म्हणून भारत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचाही ठाम विरोध करतो. गेल्या काही दिवसांत झालेल्या अशा हल्ल्यांमुळे काही भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे किंवा ते बेपत्ता आहेत”, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

संघर्ष लवकरात लवकर थांबवा

“त्यामुळे, हा संघर्ष लवकरात लवकर संपावा असं आम्ही ठामपणे सांगत आहोत. प्रभावित देशांमधील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास भारतीय नागरिक आणि समुदाय संघटनांच्या सतत संपर्कात आहेत आणि योग्यतेनुसार नियमित सूचना (अ‍ॅडव्हायझरी) जारी करत आहेत. या संघर्षामुळे अडकलेल्यांना त्यांनी शक्य ती सर्व मदतही केली आहे”, असंही भारताने म्हटलंय.