पीटीआय, क्वालालंपूर

भारताला आज जगात विकासासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिले जाते. याचा प्रत्यय ब्रिटन, अमेरिका, युरोपीय महासंघासह अनेक देशांबरोबर भारताने केलेल्या व्यापार करारांतून येतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मलेशियामध्ये केले. क्वालालंपूर येथे झालेल्या एका सामुदायिक कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारतीय वंशाचे लोक भारत आणि मलेशिया यांच्यातील मैत्रीचा मजबूत दुवा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मलेशियात दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीत महत्त्वाचा आणि व्यापक अजेंडा असून, भारत-मलेशिया विशेष भागीदारीला मोठी चालना मिळेल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

यावेळी मोदी यांनी ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, युरोपीय महासंघ आणि अमेरिका यांच्याशी झालेल्या करारांचा उल्लेख केला. भारत आणि मलेशिया एकमेकांना चांगले ओळखतात, कारण भारतीय भाषांमध्ये आणि मलय भाषेत अनेक सारखे शब्द आहेत, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०२६ मधील हा त्यांचा पहिला परदेश दौरा असून मलेशियात येऊन आपल्याला खूप आनंद होत आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे पंतप्रधान होण्यापूर्वीपासूनच आपले मित्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मलेशियातील तमिळ समाज विविध क्षेत्रांत समाजसेवा करत आहे. ‘तमिळ समाज येथे अनेक शतकांपासून आहे. या समृद्ध इतिहासामुळेच आम्ही मलेया विद्यापीठात तिरुवल्लुवर चेअर स्थापन केली. आता सामायिक वारसा अधिक मजबूत करण्यासाठी तिरुवल्लुवर केंद्रही उभारणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

भारताने अनेक देश आणि गटांशी व्यापार करार केले आहेत. भारतावर जगाचा विश्वास वाढत आहे. विश्वास ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान