देशात गेल्या काही दिवसात अचानक करोना रुग्णवाढ झाल्याचं दिसत आहे. असं असताना करोना लसीकरणाचा वेगही वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे देशातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. देशात आतापर्यंत सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस आणि झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींना परवानगी दिली आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरातल्या अनेक देशांपेक्षा राज्यातला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने याबाबतची आकडेवारी दिली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरयाणात सर्वाधिक लसीकरण होत आहे.

सप्टेंबर महिन्यात प्रत्येक दिवसाला देण्यात येणाऱ्या लसींची तुलना इतर देशांशी केली आहे. उत्तर प्रदेशात एका दिवसात अमेरिकेपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दिवसाला ११.७३ लाख डोस दिले आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण ८.०७ लाख इतकं आहे. गुजरातमध्ये मेक्सिकोपेक्षा अधिक लस दिल्या गेल्यात. गुजरात दिवसाला ४.८० लाख, तर मेक्सिकोत ४.५६ लाख लस दिल्या गेल्यात. कर्नाटक आणि रशियाची तुलना केल्यास रशियात दिवसाला २.८४ लाख, तर कर्नाटकात ३.८२ लाख लसी दिल्या गेल्यात. मध्य प्रदेश आणि फ्रान्सची तुलना केल्यास मध्य प्रदेशात ३.७१ लाख लसी, तर फ्रान्समध्ये २.८४ लाख लसी दिल्या गेल्यात. हरयाणा आणि कॅनडाची तुलना केल्यास हरयाणात १.५२ लाख लसी, तर कॅनडात ०.८५ लाख लसी दिल्या गेल्यात.

देशात गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ९७३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ३७ हजार ६८१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी की, शुक्रवारच्या (९ सप्टेंबर) तुलनेत नव्या करोना रुग्णसंख्येत ७.७ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे, नव्या करोना रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांचा आकडा देखील मोठा आहे. मात्र, करोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनामुळे २६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही अधिकृत आकडेवारी जारी केली आहे.