जेरुसलेम : भारत आणि इस्रायलने गुरुवारी राजनैतिक संबंध विशेष सामरिक भागीदारी दर्जावर नेले आणि दोन्ही देशांना पूरक असा मुक्त व्यापार करार लवकरच करण्याचा निर्धार व्यक्त केला. इस्रायलबरोबर व्यापार, ऊर्जा, कृषी, सायबर, डिजिटल पेमेंट अशा विविध क्षेत्रांत या वेळी करार करण्यात आले. इस्रायलमध्ये ‘यूपीआय’चा वापर आता करता येणार असून, दहशतवादाविरोधात दोन्ही देश खांद्याला खांदा लावून उभे आहेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी गाझामध्ये सुरू असलेल्या शांतता प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला; तसेच कुठल्याही संघर्षात मानवतेचा बळी कदापि जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. लष्करी साहित्याचे संयुक्तपणे उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतराद्वारे दोन्ही देशांतील संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

माध्यमांना दिलेल्या निवेदनात मोदी म्हणाले, ‘भारताचे सुरक्षेचे हितसंबंध पश्चिम आशियामधील शांतता आणि स्थिरतेमध्ये आहेत. त्यामुळे भारताचा गाझामधील शांतता प्रक्रियेला पूर्ण पाठिंबा आहे. गाझामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे. भविष्यातही सर्व देशांशी भारत चर्चा आणि सहकार्य सुरू ठेवेल.’

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जगामध्ये दहशतवादाला थारा असता कामा नये, या मताचे भारत आणि इस्रायल दोन्ही देश आहेत. परस्परविश्वास, लोकशाहीची मूल्ये आणि मानवी संवेदना यांच्या मजबूत आधारावर आपल्यातील संबंध प्रस्थापित झाले आहेत. संकटाच्या प्रत्येक वेळी आपल्यातील संबंध कसोटीस उतरले आहेत. दोन्ही देशांतील संबंधांना ‘विशेष सामरिक भागीदारी’ दर्जा आज आपण दिला आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी यॉद व्हशेम येथील स्मारकाला भेट देऊन वंशसंहारात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण केली. मोदी यांनी इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हरझॉग यांची भेट घेतली. इस्रायलच्या तंत्रज्ञान कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन मोदींनी केले. पंतप्रधान मोदींनी क्नेसेटमध्ये केलेल्या भाषणाबद्दल हिब्रू विद्यापीठाने त्यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदी म्हणाले…

  • भारत आणि इस्रायलमध्ये महत्त्वाच्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी भागीदारी. याद्वारे कृत्रिम प्रज्ञा (एआय), क्वांटम आणि दुर्मीळ खनिजे यांमध्ये सहकार्य
  • इस्रायलमध्ये ‘यूपीआय’चा वापर करता येणार. भारत आणि इस्रायलचा दहशतवादाला पूर्ण विरोध. जगामध्ये कुठल्याही स्वरुपातील दहशतवादाला थारा असता कामा नये, यावर दोन्ही देशांचे एकमत.