India Israel Iran Conflict Update MEA Statement : इराण-इस्रायल देशांनी पुन्हा एकदा एकमेकांवरील हल्ले सुरू केले आहेत. इराणने आज सकाळी इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करून त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तर, या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हल्ले केले. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या या युद्धग्रस्त देशांमध्ये पुन्हा एकदा हल्ल्यांना सुरुवात झाल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. परिणामी यावर आता भारताने ठोस भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत पत्रक सादर करून हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याचं आवाहन केलं आहे.

राजनैतिक वाटाघाटी करा

२८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण युद्धाला सुरुवात झाली. तेव्हापासून जागतिक बाजारपेठेत मंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या तिन्ही देशातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर जल वाहतूक कोंडी करण्यात आली. परिणामी जगभरातील इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या युद्धाचा थेट फटका देशातील सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यातच, आता पुन्हा एकदा युद्ध सुरू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यावरून सुरू असलेल्या वाटाघाटींमधून राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन भारताने केलं आहे.

मानवी हालअपेष्टा अन्…

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल म्हणाले, “पश्चिम आशियातील पुन्हा सुरू झालेल्या हल्ल्यांबद्दल भारत तीव्र खेद व्यक्त करत आहे. या घडामोडी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब आहेत. हा संघर्ष आता १०० हून अधिक दिवस चालला असून यामुळे आधीच अफाट मानवी हालअपेष्टा झाल्या आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा पुरवठ्यावरही याचा घातक परिणाम झाला आहे.”

पुन्हा शांतता प्रस्थापित करा

“आम्ही सर्व पक्षांना तात्काळ तणाव कमी करण्याचे, नागरिकांना कोणतीही हानी पोहोचणार नाही याची खात्री करण्याचे आणि सुरू असलेल्या वाटाघाटींमधून राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन करतो जेणेकरून या प्रदेशात पुन्हा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकेल”, असं आवाहन भारताकडून करण्यात आलं आहे.