India Israel UPI Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांत काही महत्वाचे करार देखील होत आहेत. या अनुषंगानेच आता भारत आणि इस्रायलमध्ये एक महत्वाचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांत एक महत्त्वाचा करार झाला असून आता भारताचं यूपीआय (UPI) इस्रायलमध्येही चालणार आहे. त्यामुळे भारताच्या डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात हा एक मोठा निर्णय मानला जात आहे.

कारण भारताचं यूपीआय (UPI) इस्रायलमध्ये चालणार असल्याने याचा सकारात्मक परिणाम हा व्यवसाय, शिक्षण किंवा पर्यटनासाठी इस्रायलला वारंवार प्रवास करणाऱ्या सामान्य लोकांवर होणार आहे. आता भारतीय नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या परकीय चलनावर किंवा महागड्या कार्ड शुल्कावर अवलंबून राहावं लागणार नाही. मोबाईलच्या माध्यमातून काही क्षणात सुरक्षित पेमेंट करणं शक्य होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांत व्यापार, शेती, ऊर्जा, डिजिटल पेमेंटमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी विस्तृत करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वपूर्ण खनिजे यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भारत-इस्रायल भागीदारी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी म्हटलं की, “मला आनंद आहे की इस्रायलमध्ये UPI च्या वापरासाठी एक महत्वाचा करार झाला आहे.”

इस्रायल संसदेला संबोधित करताना मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “या सन्माननीय सभागृहासमोर उभं राहणं माझ्यासाठी एक भाग्य आणि सन्मान आहे. मी हे भारताचा पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या संस्कृतीला संबोधित करत आहे. मी माझ्यासोबत १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन इस्रायलमध्ये आलो आहे.”

“दहशतवादाचं कोणीही समर्थन करू शकत नाही. भारतानेही बऱ्याच काळापासून दहशतवादामुळे दुःख सहन केलंय. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात इस्रायली नागरिकांसह निष्पाप जीव गमावल्याचं दुःख आजही आम्हाला आहे. तुमच्याप्रमाणे आमचंही दहशतवादाबद्दल शून्य-सहिष्णुता धोरण आहे”, असं मोदींनी म्हटलं.

“गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. गेल्या काही वर्षांत भारताने इतर देशांबरोबर अनेक महत्त्वाचे व्यापारी करार केले आहेत. त्यासाठी आमची टीम एका मोठ्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीसाठी कठोर परिश्रम घेत आहे”, असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.