पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सनाए ताकायची यांच्यातील शिखर परिषदेतील चर्चेनंतर दोन्ही देशांत गुरुवारी विविध क्षेत्रांमध्ये करार झाले. आर्थिक भागीदारी, संरक्षण साहित्याचे संयुक्त उत्पादन यांसह ऊर्जा क्षेत्रातील संबंध दृढ होणार आहेत.

आर्थिक सुरक्षेचा जाहीरनामा, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सहकार्यावर संयुक्त निवेदन, ऊर्जापुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठीचे निवेदन या वेळी प्रसिद्ध करण्यात आले. जहाजबांधणी, विमानक्षेत्र आणि पुरवठासाखळीमधील सहकार्य वाढविण्यासाठी आवश्यक चौकट निश्चित करण्यात आली.

मोदी म्हणाले, “आजच्या अस्थिरतेच्या जगात भारत आणि जपानने आर्थिक व ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व जाणले आहे. हे लक्षात घेऊन आर्थिक सुरक्षेसाठी आम्ही संयुक्तपणे आराखडा तयार केला आहे. याद्वारे सेमीकंडक्टक, क्वांटम तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सामग्रीची पुरवठा साखळी आम्ही मजबूत करू.’’

मोदी आणि ताकायची यांच्यात हिंद-प्रशांत क्षेत्रासंबंधीही चर्चा झाली. या ठिकाणी चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. भारत आणि जपान जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. मुक्त, समृद्ध, आणि नियमाधारित हिंद-प्रशांत क्षेत्राला आमचे प्राधान्य असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. या भागातील सर्वांत मोठे लोकशाही देश आणि अर्थव्यवस्था असल्याचे विचारात घेऊन अनेक उपक्रम आम्ही सुरू केले असून, या संपूर्ण प्रदेशात शांतता, स्थिरता, प्रगतीला हातभार लागेल, असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले, ‘ऊर्जा सुरक्षेसाठीही दोन्ही देशांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारत-जपान बायोगॅस उपक्रमाद्वारे भारतामध्ये एक हजार बायोगॅस आणि ऑरगॅनिक खतप्रकल्प उभारण्यासाठी सहाय्य मिळणार आहे. देशाच्या ग्रामीण भागामध्ये समृद्धी आणण्यासाठी त्यामुळे चालना मिळेल. तेलपुरवठा विस्कळीत होण्यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. बॅटरी, हरित हायड्रोजन, अणुऊर्जेतील पुढाकारामुळे जगामध्ये अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात दोन्ही देशांचे महत्त्वाचे योगदान राहील.’

पंतप्रधानांचे मुद्दे

– गेल्या वर्षभरात भारत-जपानमध्ये शंभरहून अधिक व्यापारी करार. याद्वारे १० अब्ज डॉलरहून अधिक जपानची भारतामध्ये गुंतवणूक होणार

– पुढील १० वर्षांत जपानची १० ट्रिलियन येन भारतामध्ये गुंतवणूक आणि जपानच्या सध्याच्या देशांतील कंपन्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट

– भारत आणि जपानमध्ये सांस्कृतिक संबंधांपासून तंत्रज्ञानापर्यंत खूप साम्य

– संरक्षण क्षेत्रांत संयुक्त उत्पादनाचे, औषधनिर्माणक्षेत्रामध्ये दोन्ही देशांत विविध करार

ऊर्जा सुरक्षेसाठीही दोन्ही देशांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारत-जपान बायोगॅस उपक्रमाद्वारे भारतामध्ये एक हजार बायोगॅस आणि सेंद्रिय खतप्रकल्प उभारण्यासाठी सहाय्य मिळणार आहे. बॅटरी, हरित हायड्रोजन, अणुऊर्जेतील पुढाकारामुळे जगामध्ये अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात दोन्ही देशांचे महत्त्वाचे योगदान राहील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतामधील १७ सामरिक क्षेत्रांत गुंतवणूक करून जपानची पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञानाची क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित करायचे ठरविले आहे. भारताच्या विकासाला ते चालना देत आहेत. दोन्ही देशांतील परस्परगुंतवणुकीद्वारे दोन्ही देशांनी समृद्धीचे उद्दिष्ट ठेवले आहे. – सनाए ताकायची, पंतप्रधान, जपान