चीन पाकिस्तानला एकुण २३६ अत्याधुनिक SH-15 या तोफा देणार आहे. या तोफा २०१९ ला चीनच्या लष्करात दाखल झाल्या असून मोठ्या प्रमाणात तिबेटमध्ये भारताच्या सीमेजवळ तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. आता पाकिस्तानला या तोफा देत भारताला एक प्रकारे शह देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. पाकिस्तानने याआधीच २३६ तोफांबाबत करार केला होता, पुढील काही दिवसांत SH-15 तोफांची पहिली तुकडी पाकिस्तानात दाखल होणार असल्याचं वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिलं आहे.
विशेष म्हणजे भारताच्या लष्कराने नुकतीच दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान असलेल्या स्वयंचलित K-9 वज्र तोफांची २००ची ऑर्डर लार्सन अँड टुर्बोला दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अशा १०० तोफा याआधीच लष्करात दाखल झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात भारताच्या लष्कराने तोफखाना विभाग मजबूत करण्याच्या दृष्टीने शिस्तबद्ध पावले टाकली आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेही त्यांच्या तोफखानाच्या आधुनिकरणावर भर दिल्याचं दिसून येत आहे.




SH-15 तोपेची काय वैशिष्ट्ये आहेत ?
चीनची आघाडीची तोफ म्हणून SH-15 कडे बघितलं जात आहे. आधुनिक अशा ट्रकवर ही तोफ बसवण्यात आली आहे. यामुळे ही तोफ सहज कुठेही वाहून नेणे शक्य होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तोफेतून तब्बल ७२ किलोमीटर अंतरापर्यंत मारा करता येणे शक्य आहे. यामुळेच सीमेपासून सुरक्षित अंतरावरुन शत्रु पक्षाच्या भागात खोलवर मारा करणे शक्य आहे. यामुळेच पाकिस्तानसाठी या तोफा महत्त्वाच्या ठरणार आहेत. असं म्हटलं जातं की भारताच्या K-9 वज्र तोफेला पाकिस्तान SH-15 या तोफेने प्रत्युत्तर देऊ शकणार आहे. तेव्हा शस्त्रसज्जतेच्या बाबतीत पाकिस्तानला आधुनिक करत चीन भारताला शह देत आहे.