पीटीआय, बंगळुरू : राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने (इन-स्पेस) अंतरिक्ष क्षेत्रात प्रक्षेपणासाठी खासगी उद्योगांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला हे दालन खुले झाले आहे. भारतातील खासगी उद्योगांना अंतराळ क्षेत्रात प्रोत्साहन, त्यांना अधिकृत मान्यता आणि त्यांच्यावर नियंत्रण व देखरेखीसाठी ‘इन-स्पेस’ ही स्वायत्त संस्था स्थापण्यात आहे.

‘इन-स्पेस’ने सोमवारी एका निवेदनाद्वारे सांगितले, की हैदराबादच्या ‘ध्रुव स्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि बंगळुरूच्या ‘दिगंतर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांना अंतराळ प्रक्षेपणास मंजुरी दिली. ‘ध्रुव स्पेस’च्या ‘ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर’ व ‘दिगंतर रिसर्च’च्या ‘रोबस्ट इंटिग्रेटिंग प्रोटॉन फ्लुएन्स मीटर’ (रोबी) या दोन उपकरणांना (‘पेलोड’) प्रक्षेपणास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यांना ‘पीएसएलवी-सी५३’ च्या ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मोडय़ूल’द्वारे (पीओईएम) ३० जूनला प्रक्षेपित केले जाणार आहे.

‘इन-स्पेस’चे अध्यक्ष पवनकुमार गोयंका म्हणाले, ‘‘इन-स्पेसद्वारे पहिल्या दोन प्रक्षेपणांना मान्यता मिळणे एक महत्त्वाचे पाऊल आहे.  भारतातील खासगी क्षेत्राद्वारे अंतराळ प्रक्षेपणाचे नवे युग सुरू होणार आहे.  ‘ध्रुव स्पेस’ व ‘दिगंतर रिसर्च’ हे अंतराळ तंत्रज्ञान नवउद्योग (स्टार्टअप) आहे.  ‘पीएसएलव्ही-सी५३’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) ५५ वी मोहीम आहे. ३० जूनला हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी सहाला प्रक्षेपित केले जाणार आहे.’’