‘ब्रिक्स’ परिषदेत प्रथमच सहभागी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला अनपेक्षित यश मिळण्याची चिन्हे आहेत. विकसनशील पाच देशांच्या भेटीत ‘ब्रिक्स विकास बँक’ स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून तिचे अध्यक्षपद भारताकडे येण्याचे दृष्टिपथात आहे. अर्थात बँकेचे मुख्यालय हे भारताचा कट्टर स्पर्धक चीनमध्येच असणार आहे.
मोदी यांनी ब्राझील येथे होत असलेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी प्रयाण करण्यापूर्वीच नवी दिल्ली येथे या प्रस्तावित बँकेचा ‘न्यू डेव्हलपमेन्ट बँक’ असा उल्लेख केला होता. ‘ब्रिक्स’ हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या विकसनशील देशांचा प्रमुख गट आहे. या देशाकडे नव्या बँकेचे पहिले अध्यक्षपद देण्याचा कल दिसून आला. तर जगातील तिसरे मोठे आर्थिक केंद्र चीनमधील शांघाय येथे या नव्या बँकेचे मुख्यालय असावे, असाही विचार पुढे आला. नवागत ‘ब्रिक्स’ बँकेच्या पहिल्या अध्यक्षपदासाठी दक्षिण आफ्रिकेनेही दावा केल्याचे सांगितले जाते; मात्र भारताचे नाव पुढे आल्यावर या देशाचा विरोध मावळला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारपासून सुरू झालेल्या सहाव्या ‘ब्रिक्स’ परिषदेत सहभागी झाले आहेत. दोन दिवसाच्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘ब्रिक्स’ सदस्य देशांच्या प्रमुखांशी त्यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी ‘ब्रिक्स’ विकास बँकेत सहभागी होण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला. ५० अब्ज डॉलरच्या या बँकेत सर्व सदस्य राष्ट्रांना समान हिस्सा मिळण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. पहिल्या ब्रिक्स बँकेची स्थापना, तिचे ठिकाण, तिचे प्रमुख तसेच भागीदारी याबाबत सदस्य राष्ट्रांमध्ये चर्चा झाली.

बँकेची कल्पनाही भारताचीच
ब्रिक्स बँकेची कल्पना सर्वप्रथम भारतानेच मांडली होती. विकसनशील देशांमधील व्यापार संबंध विस्तारित करण्याच्या दृष्टिने अशा सामायिक बँकेची गरज मांडण्यात आली होती. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवणाऱ्या जागितक संस्थांचा कल केवळ विकसित राष्ट्रांकडेच असल्याची भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांची तक्रार होती. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत चीनमध्ये या बँकेचे मुख्यालय ठेवण्याचा विचार झाला होता. मात्र बँकेचे अध्यक्षपद मिळविण्यात मोदी यांची शिष्ठाई सफल होण्याची चिन्हे आहेत.