संयुक्त राष्ट्रसंघाने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला दहशतादी घोषित करावे यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असले तरी या प्रयत्नांना चीनने खीळ घातली असून तसे करण्याचे जोरदार समर्थनही चीनने केले आहे. आपली भूमिका योग्य आणि वस्तुस्थितीवर आधारित असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीन नेहमीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील ठरावांचा आणि संबंधित नियमांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करीत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीन आणि भारत हे दहशतवादाचे बळी ठरले आहेत आणि दहशतवादाच्या मुकाबल्याचा प्रश्न येतो तेव्हा दोघांची भूमिका समान आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सहकार्याबाबत चीनचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख भूमिकेला पाठिंबा आहे. पठाणकोट हवाई दल तळावरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अझरवर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये खोडा घालण्याची चीनची ही दुसरी वेळ असून त्याचे चीनने समर्थन केले आहे.