LPG Gas Cylinder Shortage rumors : पश्चिम आशियातील संघर्षमय परिस्थितीमुळे देशातील पेट्रलिअम पदार्थांच्या आयातीवर परिणाम झाला आहे. तसंच, होर्मुझ सामुद्रधुनीवरही निर्बंध असल्याने एलपीजीचीही वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी देशात एलीपीज वापरावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे नागरिक गॅस एजन्सीबाहेर रांगा लावून बसले आहेत. तसंच सोशल मीडियावरही काही चुकीच्या बातम्यांमुळेही नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ही भीता आता पेट्रोलिअम मंत्रालयाने दूर केली आहे.
गॅस बुकिंग केल्यानंतर ३५ दिवसांनी येत असल्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट्सना कोणताही आधार नसून देशात एलपीजीचा पुरेसा साठा असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केलं की एलपीजी रिफिल बुकिंगच्या कालावधीत बदल झाल्याचा दावा करणारे सोशल मीडियावर पसरत असलेले वृत्त खोटे आहे. देशात एलपीजीचा पुरेसा पुरवठा आहे आणि नागरिकांना घाबरण्याची गरज नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध
रिफिल बुकिंग करण्याकरता कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रिफिल बुकिंगची सध्याची कालमर्यादा बदललेली नसून सध्याच्या प्रणालीनुसारच सुरू राहणार असल्याचंही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे एलपीजीच्या पुरवठ्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आणि ते पसरवू न देण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे. देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून चिंतेचे कोणतेही कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
तर, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनेही वेळापत्रकात बदल झाल्याच्या वृत्तांबाबतची चिंता दूर केली आहे. या तेल कंपनीने म्हटले आहे की, “एलपीजी रिफिल बुकिंगच्या वेळापत्रकात बदल झाल्याचा दावा करणारी वृत्ते चुकीची आहेत. सध्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. आणि देशभरात एलपीजीचा पुरवठा पुरेसा आहे. कृपया केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवा आणि घाबरू नका”
मंत्रालयाने जनतेला चुकीच्या माहितीचा प्रसार करण्यापासून किंवा त्यावर विश्वास ठेवण्यापासून सावध केले आहे. तसंच ग्राहकांना अनावश्यक किंवा घाबरून रिफिल बुकिंग करणं टाळण्याचंही आवाहन केलं आहे.
