LPG Gas Supply Shortage India: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतासह जगावर इंधन आणि गॅस तुटवड्याचे संकट उभे असताना एलपीजी पुरवठ्याबाबत टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. एलपीजी गॅस पुरवठ्याचा तुटवडा पुढील तीन ते चार वर्षे भासू शकतो, अशी भीती सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. “उत्पादन प्रकल्पांना किती प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत स्पष्टता नसल्याने पुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता तात्पुरती आहे की दिर्घकालिन हे सांगता येत नाही”, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारत एलपीजी पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात पश्चिम आशियावर अवलंबून आहे.

दुरस्तीसाठी तीन वर्षांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता

भारतात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस पुरवठा पश्चिम आशियातून होतो. पण, सध्या या भागात संघर्ष सुरु असल्यामुळे समुद्री वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्याने पुरवठ्यावर आणखी परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरात विविध उर्जा प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. यात उत्पादन प्रकल्पांना मोठे नुकसान झाले आहे. “पुरवठादारांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीसाठी कदाचित तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे”, असे वृत्त मनीकंट्रोल या संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे.

आयातीवर अवलंबून

इंधन आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतात दरवाढ झाली आहे. देशात एलपीजी गॅसची मोठी मागणी आहे. देशातील ६० टक्के गॅस पुरवठ्याची गरज आयातीतून पूर्ण होते. तर यातील ९० टक्के वाहतूक एकट्या होर्मुझ सामुद्रधुनीतून केली जाते. पण, इराण युद्ध सुुुरु झाल्यापासून हा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पर्यायी मार्गांचा वापर केला तरी देखील ४० ते ५० टक्के पुरवठा विस्कळीत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सरकारी अधिकारी काय म्हणाले?

“प्रमुख एलपीजी पुरवठादार बंद झाल्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, नक्की कशाला फटका बसला आहे? काय बंद आहे? याबाबत पुरेशी माहिती समोर आलेली नाही. साठ्यांवर परिणाम झाला आहे का उत्पादन प्रकल्पांचे नुकसान झाले आहे अथवा बंद झाले आहे? याची काहीच माहिती मिळालेली नाही. पण, त्यांनीच सांगितल्याप्रमाणे हे सर्व सुरळीत होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो”, असे एका सरकारी अधिकाऱ्याने मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले. दरम्यान, कोरोना काळात करण्यात आलेल्या काही उपाययोजनांचा यामध्ये उपयोग करुन घेता येऊ शकतो, असे मत अधिकाऱ्याने मांडले.