अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. यादरम्यान भारताकडे येणारे सुमारे ९४ हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन येणारे दोन टँकर होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारताच्या दिशेने येत आहेत, अशी माहिती सरकारने दिली आहे.
‘BW Tyr’ आणि ‘BW Elm’ हे टँकर अनुक्रमे ३१ मार्च रोजी मुंबईत आणि १ एप्रिल रोजी न्यू मँगलोर येथे पोहोचण्याची शक्यता आहे, असे पेट्रोलियम मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. मात्र, मित्र राष्ट्रांच्या जहाजांनी इराणी प्रशासनाशी समन्वय साधला तर ते या जलमार्गाने प्रवास करू शकतात असे इराणने म्हटले आहे.
होर्मुझच्या या अरुंद मार्गाने सुरक्षितपणे बाहेर पडणारी ही भारताची नवी जहाजे आहेत. शुक्रवारी समोर आलेल्या एलएसईजी (LSEG) जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, आतापर्यंत एलपीजी गॅसच्या ४ टँकर्सनी हा जलमार्ग यशस्वीपणे ओलांडला आहे, तर आणखी ३ टँकर्स अजूनही सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात आहेत.
पश्चिम आखाती क्षेत्रात अजूनही ४८५ भारतीय खलाशांसह भारताचा ध्वज असलेली एकूण १८ जहाजे आहेत, असे सरकारने म्हटले आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी (LPG) आयातदार देश आहे. भारतात गेल्या वर्षी ३३.१५ दशलक्ष टन गॅसचा वापर केला गेला. भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे ६० टक्के गॅस हा आयात केला जातो आणि विशेष म्हणजे या आयातीपैकी सुमारे ९० टक्के गॅस हा मध्य पूर्वेतील देशांतून येतो.
