India LPG Imports : अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद आहेत. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. या तणावाचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा अमेरिका-इराण युद्ध सुरू होतं, तेव्हा भारताला देखील तेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर गेल्या काही महिन्यांत भारताच्या एलपीजी आयातीच्या धोरणात मोठे बदल करण्यात आले आहेत.

भारत आता एलपीजी पुरवठा साखळीत मोठे परिवर्तन घडवण्याची तयारी करत आहे. भारत बहुतांश एलपीजीच्या आयातीसाठी आधी मध्य-पूर्वेवर अवलंबून होता. पण आता भारताने अमेरिकेतून एलपीजीची आयात वाढवली आहे. भारताला एकूण ६७ टक्के एलपीजीचा पुरवठा आता अमेरिकेकडून होत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, अमेरिका आता भारताचा सर्वात मोठा एलपीजी पुरवठादार देश बनला आहे. मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, “भारताने सुरुवातीला आपल्या एलपीजीच्या एकूण गरजांपैकी थोडा हिस्सा अमेरिकेकडून मिळवण्याचं नियोजन केलं होतं. मात्र, ते प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढण्यात आलं आहे.”

मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काय सांगितलं?

“भारत सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला देशाच्या एलपीजीच्या एकूण गरजेपैकी १० टक्के आयात अमेरिकेकडून करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज भारताच्या एकूण एलपीजी आयातीपैकी सुमारे ६७ टक्के वाटा अमेरिकेचा आहे”, असं मंत्री हरदीप सिंह पुरी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या म्हणण्यानुसार, आता भारताच्या एलपीजीच्या आयातीच्या धोरणात आणि पुरवठा स्रोतांच्या पद्धतीत बदल झाला आहे. मात्र, भारत अजूनही अनेक वेगवेगळ्या देशांकडून कच्च्या तेलाची आयात आणि एलपीजीची खरेदी करत आहे. असं असलं तरी एलपीजीच्या आयातीमध्ये अमेरिका हा प्रमुख पुरवठादार देश बनला आहे. पुरवठादारांमध्ये विविधता आणणं हा ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याचा आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर जास्त अवलंबून राहिल्यानंतर निर्माण होणारे धोके कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.